पिंपरी, दि. 27 (प्रतिनिधी) – शहरातील रुग्णांसाठी खरेदी केलेल्या हाय वॅक्युम सक्शन मशीन खरेदी प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे गंभीर आरोप थेट आमदारांकडून झाल्यानंतरही अद्याप अधिकाऱ्यांनी याबाबत आश्चर्यकारक रित्या मौन बाळगले आहे. वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांनी अद्याप खुलासा दिलेला नाही. निविदेच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून स्वतःच्या फायद्यासाठी अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला पात्र ठरवून पिंपरी-चिंचवडमधील करदात्यांची फसवणूक केल्याचा ठपका वैद्यकीय विभागातील अधिका-यांवर ठेवला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रुग्णसेवेच्या नावाखाली करोडोंची वैद्यकीय उपकरणे, मशीन्स व तत्सम साधने खरेदी केली जातात. नुकतेच वैद्यकीय विभागाने रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या नावाखाली हाय वॅक्युम सक्शन मशीन खरेदी करण्यासाठी निविदा मागवून घेतल्या. त्यासाठी टेक्निकल स्पेशिफिकेशननुसार अटी व शर्ती घालून देण्यात आल्या. ठेकेदाराने दिलेल्या प्रत्यक्ष मशीनचा तापशील आणि निविदेतील तपशीलामध्ये मोठी तफावत जाणवते. त्यामुळे निविदेतील अटी शर्तींचे उल्लंघन करून अधिका-यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संबंधित ठेकेदाराला मशीन पुरवठा करण्याचे काम दिल्याचा आरोप
केला जात आहे.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी निवेदन काढून याप्रकरणी अधिकारी आणि ठेकेदार यांची चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, अद्याप याबाबत प्रशासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारच्या हालचाली सुरू झालेल्या नाहीत. वैद्यकीय विभागाचा कार्यभार सांभाळणा-या संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत अद्याप चक्कार शब्द काढलेला नाही. अधिकाऱ्यांनी मौन बाळगल्यामुळे मशीन खरेदीत नक्कीच आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय बळावला आहे. निविदेतील अटी शर्तींचे उल्लंघन का केले?, निविदेतील आणि मशीनचे टेक्निकल स्पेशिफिकेशन मिळते जुळते का नाही?, तांत्रिक तपशील एक नसताना मशीन का घेतल्या?, निविदेतील मशीनची किंमत 6 लाख 80 हजार आणि जीईएम पोर्टलवर याच मशीनची किंमत 3 ते 4 लाखांना कशी काय?, वाढीव दराने मशीन खरेदीचा उद्देश काय?, या प्रश्नांची उत्तरे वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांनी देणे अपेक्षित आहे.
तांत्रिक तपशीलात असंख्य त्रुटी
पुरवठादार ठेकेदाराने वैद्यकीय विभागाला दिलेल्या मशीनमध्ये निविदेत नमूद तब्बल 14 हून अधिक टेक्निकल स्पेशिफिकेशन नसल्याची बाब समोर आली आहे. मशीनमध्ये चुकीचे ऑपरेटिंग सिस्टीम, चुकीचा एअर फ्लो, व्हायरस फिल्टर नसणे, उच्चतम आवाज पातळी, मशीनमध्ये मेंब्रेन प्रणाली नसणे, इलक्ट्रिक शॉक न लागण्याची प्रणाली नसणे, सॉलिडीफायडर नसणे यांसह अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी आहेत. या मशीन वापरात आणल्यास उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्या मशीन हाताळणाऱ्या वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला व जिवाला धोका होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.