राऊत कुटुंबीयांकडून बैलाची अंत्ययात्रा काढून विधी : शिक्रापुरात बैलगाडाप्रेमी हळहळले
शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी येथे पंढरीनाथ राऊत या शेतकऱ्याच्या नाथा बैलाचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र, शेतकऱ्याने बैलाची पुष्पवृष्टी करीत अंत्ययात्रा काढून बैलाचे पूजन करीत बैलाचा अंत्यविधी केला. आपल्या लाडक्या बैलावरील प्रेम व्यक्त केले.
मात्र, शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंबाला अश्रू अनावर झाले. लाडक्या नाथाच्या मृत्यूमुळे बैलपोळा सण देखील साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय राऊत कुटुंबीयांनी घेतला आहे.
विशेष म्हणजे कोठेही मोकळे सोडले तरी कोणाला साधा धक्का देखील न देता अथवा कोणत्या पिकाचे नुकसान न करता नाथा घरी येत होता. इतका हा माणसात एकरूप झाला होता. पहाटेच्या सुमारास नाथाचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू सर्वांना चटका लावणारा ठरला. राऊत कुटुंबीय शोकसागरात बुडाले. त्यांनी नाथाची पूजा करीत त्याच्यावर पुष्पवृष्टी करीत अंत्ययात्रा काढून बैलाचा अंत्यविधी केला.
यावेळी पंढरीनाथ राऊत, बाळासाहेब राऊत, एकनाथ राऊत, दत्तात्रय राऊत, गणेश राऊत, उद्धव बालवडे, अमोल राऊत, दादा खेडकर, सीताराम कळमकर, राकेश गायकवाड, अक्षय वाबळे, ओमकार भूमकर, सोमनाथ राऊत यांसह अनेक बैलगाडा संघटनेचे गाडा मालक तसेच गाडाप्रेमी युवक सहभागी झाले होते.
गावकऱ्यांचा आवडता “नाथा’
शिक्रापूर येथील पंढरीनाथ राऊत यांच्या गोठ्यात फेब्रुवारी 1995 मध्ये नाथाचा जन्म झाला. त्यांनतर त्याला बैलगाडा शर्यतीचे धडे दिले. नाथाने शिरुर, आंबेगाव, खेड, मावळ तालुक्यांतील अनेक ठिकाणच्या बैलगाडा शर्यतीत भाग घेत असंख्य बक्षिसे मिळवत हिंदकेसरीसह घाटाचा राजा किताब मिळवला. पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या नाथाने कधीच कोणाला मारले नाही.
अतिशय चपळ मात्र शांत असलेला नाथा राऊतवाडीतील प्रत्येक घरच्या लोकांना आपलासा वाटत होता. अनेक धार्मिक कार्यक्रमात रथ ओढणे, परण्या, मांडवडहाळे, मिरवणुकीच्या कार्यक्रमात त्याला आवडीने नेले जात होते.