Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघांसह १० राज्यांतील ९६ जागा व आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण १७५, तर ओडिशा विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील २८ जागासांठी सोमवारी मतदान होत आहे. यावेळी राज्यातील २९८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. राज्यात चौथ्या टप्प्यात पुणे, शिरुर, मावळ, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर,जालना, नंदुरबार, रावेर, अहमदनगर, शिर्डी या ११ लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
२५ ठिकाणी ईव्हीएम मशीन बिघडल्याचा प्रकार समोर
आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाला सुरुवात होताच अडथळा निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल २५ ठिकाणी ईव्हीएम मशीन बिघडल्याचा प्रकार समोर आला आहे.
ईव्हीएम मशीन बंद असल्याने मतदारांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे ६ ठिकाणी तर गंगापूर येथे २ ठिकाणी EVM मध्ये तांत्रिक बिघाड झाला. तर छत्रपती संभाजीनगरमधील काही भागात मतदानाची प्रक्रिया संथ होताना दिसत आहे.
तर दुसरीकडे, बीडच्या परळी भागातील मतदान केंद्रावरही ईव्हीएम मशीन बिघडल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे सकाळी सात वाजता मतदानाला आलेल्या मतदारांना तब्बल पाऊणतास मतदानासाठी ताटकळत उभे राहावे लागले. त्यामुळे परळीत मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, हिल्या तीन टप्प्यातील मतदानावेळी देखील राज्यात ठिकठिकाणी EVM मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे मतदारांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान देखील EVM मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.