पिंपरी – मराठवाड्यासह सर्वत्रच आज मराठा समाज बांधवांची आरक्षण नसल्यामुळे परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही प्रामाणिक भूमिका आहे. त्यामुळेच राजकीय पक्षाचा नव्हे तर समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आंदोलनाला पाठिंबा असल्याची भूमिका शहरातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शनिवारी (दि.9) स्पष्ट केली. मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज आणि विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने शनिवारी शहर बंदची हाक दिली होती. मोर्चा आणि आंदोलनात सर्वच पक्षाचे नेते मंडळी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले, पक्ष किंवा मराठा समाजाचा पुढारी म्हणून नाही तर समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आपण आंदोलनाला आलो आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण विधानसभेतही वारंवार आवाज उठविला आहे. आरक्षणासाठी जे-जे करायचे आहे ते आपण करणार असल्याचे ते म्हणाले.
माजी आमदार विलास लांडे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पेशवाईच्या जुन्या दप्तदारतही मराठ्यांची कुणबी म्हणून नोंदी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सरकारने सकारात्मक पाऊले उचलण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले.
शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले म्हणाले, महाराष्ट्रात अनाजी पंताची भूमिका कदापी खपवून घेतली जाणार नाही. अन्याय चिरडून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. राज्यातील बेकायदेशीर आणि नियमबाह्य सरकारने केंद्र सरकारला सांगून विशेष अधिवेशनात मराठा समाजासाठी आरक्षणासाठी कायदा करावा, असेही ते म्हणाले.
वेळप्रसंगी पक्षाचा राजीनामा देऊ – पवार
मराठा समाजाला 50 ते 60 वर्षांपूर्वी आरक्षण दिले असते तरी आज समाजावर आंदोलन करण्याची वेळच आली नसती. मराठा समाजाचा मतांचा वापर करणाऱ्यांना जागा दाखवा. आपण व्यक्ती म्हणून समाजाबरोबर नेहमीच असणार आहे. तसेच वेळप्रसंगी समाजासाठी पक्षाचा राजीनामा देण्याची तयारीही भाजपचे नेते एकनाथ पवार यांनी सांगितले.