पुणे – नुकत्याच पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात ध्वनिवर्धक आणि अन्य वादनामुळे ध्वनिप्रदूषणात उच्चांकी वाढ नोंदवली गेली आहे. याबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रशास्त्र विद्यापीठाने नोंदी घेतल्या आहेत. तर, उपनगरांमध्येही यंदा डीजेच्या भिंतींनी “थरथराट’ अनुभवावा लागला.
यंदा दहीहंडी काळात सर्वाधिक ध्वनिप्रदूषण नारायण पेठ परिसरात नोंदवले गेले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकांनुसार, रहिवासी क्षेत्रासाठी रात्रीच्या वेळी 45 डेसिबल, तर औद्योगिक क्षेत्रासाठी 75 डेसिबल कमाल ध्वनिपातळी सर्वोच्च मानली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सण-उत्सव काळात या सर्व मर्यादांचे उल्लंघन झाल्याचे अनुभवावे लागत आहे.
याशिवाय, विशिष्ट प्रकाराच्या झगमगाटी लायटिंगमुळे डोळ्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे उत्सव साजरा करण्याच्या नादात सामाजिक स्थिती आणि पर्यावरणाचे भान तरुणाईने जोपासायला हवे, असे मत व्यक्त होत आहे.दरम्यान, राज्य शासनाने यंदा सर्वच सण-उत्सव मोकळेपणाने साजरे करण्यास मुभा दिली आहे. पण, त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. शिवाय, शासनाचे आदेश असल्याने पोलीस प्रशासन किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे हात बांधले गेल्याची स्थिती आहे.
परिसर आणि ध्वनिपातळीच्या नोंदी (डेसिबल)
शिवाजीनगर गावठाण – 92.8
छत्रपती संभाजी महाराज उद्यान चौक – 105.2
गरवारे चौक – 103.4
ज्ञानप्रबोधिनी चौक – 100.2
महाराष्ट्र साहित्य परिषद – 104.4
स. प. महाविद्यालय चौक – 103.5
सदाशिव पेठ – 95.2
नारायण पेठ – 110.5
बाजीराव रस्ता – 108.3
शनिवारवाडा – 93.2