नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्ली येथे जगभरातील दिग्गज नेतेमंडळींची मांदियाळी जी २० परिषदेच्या निमित्ताने भरली आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी भारतात आलेल्या या खास पाहुण्यांचं भारतीय शिष्टाचार पद्धतीने पाहुणचारही केला जात आहे. या कार्यक्रमासाठी देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.
गाला डिनरसाठी उपस्थित राहण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सदन येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. “जी २० ची १८ वी शिखर परिषद दिल्लीत होत आहे. या जी २० च्या परिषदेला जगभरातील राष्ट्रध्यक्ष आणि पंतप्रधानांना मोदींनी निमंत्रित केले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री म्हणून मी उपस्थित होत आहे, मला याचा आनंद आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यासोबतच “जी २० चं अध्यक्षपद आपल्या देशाला मिळणं ही आपल्यासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये मोदींच्या नेतृत्वात सन्मानाने घेतलं जातंय याचाही अभिमान आहे. आपल्या देशाची प्रगती, अर्थव्यवस्था, चांद्रयान तीनचं यशस्व यामुळे देशाचं नाव लौकिक होत आहे, असे त्यांनी म्हटले.
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या #जी२० परिषदेच्या निमित्ताने #इंग्लंड चे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट झाली. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना याप्रसंगी महाराष्ट्राच्या वतीने शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण, पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे उपस्थित होते.… pic.twitter.com/4uDzAoe9uL
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 9, 2023
पुढे बोलताना त्यांनी,जगभरातील अर्थव्यवस्था डगमगळीत झालेली असताना आपण दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली आहे. अशा अनेक विकासाचे प्रकल्प गेल्या नऊ वर्षांत मोदींच्या मार्गदर्शनामध्ये झाले आहेत. त्यामुळे देशाचं नाव उज्ज्वल झालंय. जी २० साठी जगभरातील नेते पहिल्यांदा भारतात आले आहेत. असं देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडतंय, हे नमूद करु इच्छितो”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परदेशी पाहुण्यांसाठी डिनरचे आयोजन केले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव, चीनचे पंतप्रधान ली कियांग आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी एकूण १७० जणांना निमंत्रण देण्यात आले होते. परदेशी नेते आणि शिष्टमंडळांच्या प्रमुखांव्यतिरिक्त सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, कॅबिनेट आणि राज्यमंत्री, केंद्र सरकारचे सचिव आणि इतर मान्यवर पाहुण्यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रण होते. महत्त्वाचं म्हणजे, अनेक पाहुण्यांनी या कार्यक्रमासाठी पारंपरिक वस्त्रे परिधान केली होती.