पिंपरी – एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून पकडले. ही कारवाई चिंचवड पोलिसांनी ऍन्टी गुंडा स्कॉडच्या साथीने शनिवारी (दि. 13) केली.
मंगेश सांगळे असे अटक केलेल्या तडीपार आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील चित्तराव गणपती मंदिराजवळ चिंचवड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी ऍन्टी गुंडा स्कॉडची कारवाई करीत असताना त्यांना रुद्रा हॉटेलच्या शेजारी असलेल्या चहाच्या टपरीवर तडीपार आरोपी मंगेश सांगळे उभा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेवून सापळा रचत मंगेश सावळे याला अटक केली. त्याच्याविरुध्द कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव यांच्या पथकाने केली.