पिंपरी – पूर्ववैमनस्यातून दहा जणांच्या टोळक्याने सराईत गुन्हेगार पवन लष्करे याचा खून केला. भांडण सोडविल्याचा राग मनात धरून टोळक्याने पवनला जाधववाडी येथील सीएनजी पंपाजवळ बोलावून घेत शस्त्राने वार करत खून केला. ही घटना मंगळवारी (दि. 25) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.
सुरज रामदास मोहिते (वय 21, रा. रामनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवन विष्णू लष्करे (वय 23, रा. रामनगर, चिंचवड) हा गाड्या धुण्याचे काम करत होता. पवनचा मित्र सुरज जाधव याला सहा महिन्यांपूर्वी अक्षय काळे आणि प्रेम देवकर यांनी मारहाण केली होती.
ते भांडण पवन याने मध्यस्थी करून सोडवले होते. दरम्यान सोमवारी (दि. 24) सुरज जाधव याने प्रेम देवकर याला मारहाण केली. त्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही घटनांचा राग आरोपींच्या मनात होता.
मंगळवारी रात्री पवन त्याच्या मित्रांसोबत रामनगरमध्ये गप्पा मारत बसला होता. त्यावेळी अक्षय काळे याने पवनला शिवीगाळ करून जाधववाडी मधील सीएनजी पंपाजवळ बोलावून घेतले. पवन तिथे गेला असता अक्षय काळे, हर्षल परशुराम जाधव, सोन्या परशुराम जाधव,गणेश शिंदे,साहिल म्हस्के, राजू दोडमने आणि इतर चार ते पाच जणांनी पवनवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. यात करण वंजारे हा जखमी झाला आहे.