- आकुर्डी, थेरगाव रुग्णालयांचे लोकार्पण
- 300 खाटांची सोय
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आकुर्डी व थेरगाव याठिकाणी दोन रुग्णालये बांधण्यात आली आहेत. या दोन्ही रुग्णालयांच्या लोकार्पण सोहळा आज पार पडला. या दोन्ही रुग्णालयांमध्ये सद्यस्थितीत करोनाबाधितांवर उपचार करण्यात येणार आहे. या दोन्ही रुग्णालयांमध्ये एकूण 300 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. याचे लोकार्पण महापौर माई ढोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक व आधिकारी उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जात असताना शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षमतेने कार्यान्वित आहेत. महापालिकेने नव्याने सुरु केलेली आकुर्डी आणि थेरगांव येथील रुग्णालये यासाठी महत्वपूर्ण ठरतील. अडचणीतून मार्ग काढत थेरगांव येथील रुग्णालयाची इमारत उभी राहिली आहे. कोविडच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रभाव विचारात घेता महापालिका यंत्रणा सज्ज असून नियोजनबद्ध कामकाज करण्यात येत आहे. नागरिकांना चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका कटीबद्ध असून नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयांमुळे परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, करोना रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेने नागरिकांना चांगली आरोग्य व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचे काम केले. रुग्णवाढ आटोक्यात ठेवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. महापालिकेने चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. वैद्यकीय कर्मचारी देखील जोखीम पत्करुन सेवा बजावत आहेत. तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शहरात महापालिकेचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या कामाला थेरगांव रुग्णालयाच्या उभारणीतून मूर्त स्वरुप प्राप्त झाली.
88 कोटींचा खर्च
सुमारे 49 कोटी रुपये खर्च करुन थेरगाव येथे 8071 चौरस मीटर जागेत रुग्णालयाची सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. याठिकाणी भविष्यात 200 खाटांचे नियोजन असून भाजलेल्या रुग्णांसाठी तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा तसेच इतर उपचारांसाठी देखील सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. तर आकुर्डी येथील रुग्णालय उभारणीसाठी 39 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. 5 मजली असलेल्या या रुग्णालयामध्ये 100 खाटांचे नियोजन आहे. या दोन्ही रुग्णालयांना 88 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. तूर्तास या दोन्ही रुग्णालयांमध्ये कोविड बाधितांना दाखल करुन उपचार करण्यात येणार आहे.