बारामती – बारामती तालुक्यातील तरडोली येथील हनुमान विविध विकास सह सोसायटीच्या सचिवाने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ब वर्ग सोसायटी प्रतीनीधी म्हणून अध्यक्षांच्या नावाचा ठराव केलेला असताना दुसरा बोगस ठराव केला असल्याचे घटना उघडकीस आली आहे. या फसवणूक प्रकरणी सोसायटीचे चेअरमन प्रदीप संभाजी धायगुडे यांनी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. यानुसार सचिव रामचंद्र विठ्ठल भोसले यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगामी असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी ब ‘ वर्ग सोसायटी प्रतिनिधी म्हणून सन 2019 साली हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप संभाजी धायगुडे यांच्या नावाचा ठराव केला होता. मात्र या सोसायटीचे सचिव रामचंद्र विठ्ठल भोसले यांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करत खोटे सही, शिक्के व लेटर पॅडचा वापर करून मतदानासाठी चेअरमनचे पहिले नाव असलेला ठराव असताना दुसरा बोगस ठराव केल्याने मतदान प्रतीनीधी यादीत धायगुडे एवजी भोसले यांचे नाव आले आहे. दरम्यान धायगुडे यांच्या नावाचा ठराव कोणी कसा गायब केला ही माहीती गुलदस्त्यातच आहे.
श्री हनुमान विविध विकास सहकारी सोसायटी, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, प्रादेशिक सह संचालक साखर विभाग पुणे यांची सचीवांनी फसवणूक केली असल्याने सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप धायगुडे यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. यानुसार सोसायटीच्या सचिवावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे फौजदार एस. जी. शेख हे करीत आहेत.