राज्य सरकारने विभागीय आयुक्तांचा मागविला अभिप्राय
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नव्याने 9 गावे समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविलेला आहे. राज्य सरकारकडून मात्र 11 गावे समाविष्ट करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन बुचकळ्यात पडले आहे.
संबंधित गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याबाबत पुणे विभागीय आयुक्तांकडून राज्य सरकारने अभिप्राय मागविला आहे. हा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
बाबतचे पत्र नुकतेच नगरविकास विभागाचे उपसचिव सतीश मोघे यांनी दिले आहे. महापालिका प्रशासनाने हिंजवडी, मान, मारुंजी, गहुंजे, नेरे, सांगवडे, जांबे, विठ्ठलनगर, देहूगाव (देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्द वगळून) आदी गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश करावा, असा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेत मंजूर करून राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठविलेला आहे. त्याशिवाय, “व्हीएसएनएल’चे राहिलेले क्षेत्र देखील महापालिका हद्दीत समाविष्ट करावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
नऊ गावे समाविष्ट करण्याबाबत महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव असला तरी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मात्र हिंजवडी, मान, मारुंजे, गहुंजे, नेरे, सांगवडे आणि जांबे अशी सात गावे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. त्यांनी याबाबत दिलेल्या पत्रात म्हटलेले आहे की, आयटी क्षेत्रात नामांकित असलेले हिंजवडी आयटी हब आणि गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रीडांगणाचा विकास होत असताना मुलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात अपयश येत आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे सदर परिसरात बकालपणा वाढत आहे. निधीअभावी ग्रामपंचायती पुरेशा सेवा-सुविधा देण्यात असमर्थ ठरत आहे. पर्यायाने, कचरा, पाणीपुरवठा, रस्ते, पथदिवे असे अनेक प्रश्न या गावांतील नागरिकांना भेडसावत आहेत. या गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश केल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकेल.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत 9 गावे समाविष्ट करावी, असा प्रस्ताव महापालिकेतर्फे राज्य सरकारला पाठविण्यात आलेला आहे. राज्य सरकारने 11 गावांच्या प्रस्तावाबाबत नमूद केले आहे. त्यामुळे आणखी दोन गावे कोणती आहेत, याची माहिती घेण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त.