पुणे – मेट्रो प्रकल्पातील रुबी हॉल ते रामवाडी या मार्गीकेवरील स्थानकांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहे. उर्वरित कामे पूर्ण करून हा मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, त्या सोबतच या स्थानकाच्या परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने पादाचार्यांसह, विमानतळ तसेच नगररस्त्याने जाणार्या खासगी तसेच एसटीच्या बसेससाठी स्वतंत्र बस बे उभारले जाणार असून येरवडा मेट्रो स्थानक ते विमानतळापर्यंत स्वतंत्र फिडर सेवा असणार आहे. महामेट्रोकडून हे नियोजन करण्यात आले आहे.
असे असेल नियोजन
येरवडा मेट्रोचा स्थानकाच्या दोन्ही बाजूला लिफ्ट, सरकते जिने (एस्केलेटर) आणि पादचारी जिने बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे येरवडा मेट्रो स्थानक सुरू झाल्यानंतर होणाऱ्या संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल. तसेच प्रवाशांना चांगली सेवा देता येईल. येरवडा मेट्रो स्थानकापासून पुणे विमानतळ जवळपास ४.८ किमी अंतरावर असून त्यामुळे येरवडा मेट्रो स्थानक ते विमानतळ, अशी फिडर बस सेवा पीएमपीएमएलच्या सहकार्याने चालविण्यात येणार आहे.
विमानतळ विशेष फिडर बस थांबण्यासाठी व दोन बस बेचे नियोजन करण्यात आले आहे. मेट्रो स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला (वार्ड ऑफिसच्या बाजूला) महापालिकेची जागा असून तेथे पीएमपीएमएल बस व एमएसआरटीसी बस थांबा करण्यात येणार आहे. जेणेकरून बस थांबलेली असताना महामार्गावरील वाहनांना अडथळा होणार नाही.
“‘पुणे मेट्रो आणि पुणे मनपा यांच्या संयुक्त नियोजन करून येरवडा स्थानकाचा आराखडा वैशिष्ट्यपूर्ण बनविला आहे. त्यामुळे रस्त्यावरची कोंडी कमी होणार आहे. तसेच येरवडा स्थानक वापरणाऱ्या प्रवाशांना मल्टी मॉडेल इंटिग्रेशनचा फायदा होणार आहे.” – श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो