पिंपरी – भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून आमदार महेश लांडगे यांनी सुरूवातीला बैलगाडा शर्यतीचा लढा जिंकला आणि आता पिंपरी-चिंचवड शहरातील वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न मार्गी लावत गावगाडाही यशस्वीपणे हाकत आहेत. आमदार लांडगे यांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडकरांसाठी स्थानिक नेतृत्वाचा आशेचा किरण दिसत आहे, असे गौरवोद्गार भाजपाचे ज्येष्ठ नेते मधु जोशी यांनी काढले. तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आमदार लांडगे यांचा सन्मान करण्यात आला.
हिवाळी अधिवेशनामध्ये पिंपरी-चिंचवडमधील 42 वर्षे प्रलंबित प्राधिकरण बांधितांच्या साडेबारा टक्के परतावा, 14 वर्षे प्रलंबित शास्तीकर पूर्णमाफी आणि सोसायटीधारकांच्या समस्यांसाठी पुण्यात धोरणात्मक बैठक घेण्याबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय झाले. यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडकरांची बाजू सक्षमपणे सभागृहात मांडली. याबद्दल शहर भाजपाच्या वतीने आमदार लांडगे यांचा नागरी सन्मान करण्यात आला. या वेळी आमदार उमा खापरे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, दक्षिण भारतीय आघाडीचे राजेश पिल्ले, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, संदीप कस्पटे, हर्षल ढोरे, शशिकांत कदम, सागर गवळी, विकास डोळस, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, सोनाली गव्हाणे, योगिता नागरगोजे, यशोदा बोईनवाड, सारिका लांडगे, अश्विनी जाधव, नम्रता लोंढे, मंडलाध्यक्ष राजेंद्र लांडगे, विजय शिनकर, महादेव कवितके, महेंद्र बाविस्कर, योगेश चिंचवडे, विनोद तापकीर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार उमा खापरे म्हणाल्या की, शास्तीकराच्या ओझ्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिक वैतागले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमदार लांडगे यांचे कौतुक केले. एकनाथ पवार म्हणाले की, शास्तीकर माफी हा पिंपरी-चिंचवड शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. 2008 पासून शास्तीकराचे बांडगुळ राष्ट्रवादी कॉंग्रेसने घातले होते. ते उठवण्याचे काम आमदार महेश लांडगे यांनी केले होते. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार लांडगे यांच्या माध्यमातून मोठं गिफ्ट पिंपरी-चिंचवडकरांना मिळाले आहे. सूत्रसंचालन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांची केले, तर युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे यांनी आभार मानले.
शहरातील प्रश्न मार्गी लागत आहेत, हे इथल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांच्या एकत्रिक मेहनतीचे फलित आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मुद्यांवरच शहरातील महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. मात्र, प्रश्न मार्गी भाजपामुळे लागले आहेत. ही बाब पिंपरी-चिंचवडकर कदापी,
विसरणार नाहित.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा