नीलकंठ मोहिते इंदापूर -चालू वर्षीचा हंगाम द्राक्ष शेतीला नवी दिशा देण्याचा ठरत असल्याचे जाणवत आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून आगाप फळ छाटणी झालेल्या द्राक्षांचा तोडणी हंगाम सुरू झाला आहे. निसर्गाची साथ, शास्त्रीय ज्ञानाचा पुरेपूर वापर व तरुण द्राक्ष बागायतदारांची अपार मेहनत यांच्या जोरावर इंदापूर तालुक्यातील बोरी, तरंगवाडी, शेटफळ, कळस, वालचंदनगर, निमगाव केतकी, वरकुटे या भागातील बागायतदार द्राक्ष काढणीच्या कामांमध्ये मग्न असल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीला परदेशात ग्राहकांना इंदापूर तालुक्यातील द्राक्ष चवीने भुरळ पाडते आहे. इंदापूर तालुक्यातील द्राक्ष बागायदार मागील तीन वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा व करोना महामारीमुळे द्राक्ष बागायतदार पुरता मेटाकुटीला आला होता; परंतु चालू हंगामामध्ये द्राक्ष बागायतदारांनी काटेकोर नियोजन करून उत्कृष्ट चवीची द्राक्ष बनविली आहे. इंदापूर तालुक्यातील टपोरी, गोड, रसाळ द्राक्ष देशांतर्गत तसेच परदेशातही ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यामुळे चालू वर्षी द्राक्षांना समाधानकारक बाजार भाव (प्रति किलो 100 ते 141 रुपये) मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी द्राक्ष मालाला उठाव होऊन समाधानकारक किंमत मिळत आहे. काल-परवापर्यंत देशांतर्गत तसेच बांगलादेशला व्यापारी द्राक्ष पाठवीत असत, परंतु चालू आठवड्यापासून दुबई, थायलंड या देशांनाही द्राक्ष पाठवण्याच्या तयारीत निर्यातदार दिसत आहेत. निसर्गाची साथ, अपार मेहनत व कमीत कमी किटकनाशक, बुरशीनाशकांच्या वापरामुळे उत्कृष्ट चवीची उर्वरित अंश विरहित द्राक्षे तयार झाली आहेत. फळ छाटणीच्या तारखा विभागल्या गेल्यामुळे इंदापूर तालुक्यातील द्राक्ष हंगाम डिसेंबर ते एप्रिल असा चालणार असून उत्तम प्रतीची रंगीत द्राक्ष देशात व परदेशातही ग्राहकांना भुरळ पाडती आहे. चालू हंगामामध्ये द्राक्ष बागायतदारांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे. हलक्या पोताच्या जमिनी असणाऱ्या विशेषता तरंगवाडी भागातील शेतकऱ्यांनी ऑगस्ट पासूनच फळ छाटणीला सुरूवात केली होती व भारी मगदूराच्या जमीन मालकांनी सप्टेंबरपासून फळ छाटणीला सुरुवात केली. फळ छाटणीच्या तारखा विभागल्या गेल्यामुळे बाजारामध्ये मालाची आवक माफकच राहत आहे. तसेच अनुकूल वातावरणामुळे अप्रतिम चवीची द्राक्ष तयार होत आहेत. – राजेंद्र वाघमोडे, संचालक महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र.