पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी उपमहापौर पदाचा आज तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांनी आज सायंकाळी महापौर माई ढोरे यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. महापौर ढोरे यांनी तो स्वीकारला असून मंजूर केला आहे.
उपमहापौर केशव घोळवे यांची ऑक्टोबर महिन्यामध्ये उपमहापौर पदावर नियुक्ती झाली होती. पद देत असतानाच त्यांना पाच महिन्याचा कालावधी देण्यात आला असल्याची चर्चा रंगली होती. आज त्यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला. याबाबत बोलताना उपमहापौर केशव घोळवे म्हणाले, मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आहे. पाच महिने मी या पदावर होतो. या काळात शहरातील गोर-गरीब जनता व कामगार वर्गासाठी काम करण्याची संधी मिळाली. या काळात शहरातील दोन्ही आमदार, महापौर, पक्षनेते तसेच पालिकेतील सर्वच पदाधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. त्यामुळे चांगले काम करता आले. यापुढेही शहरातील गोर-गरीब जनतेसाठी काम करणार आहे.
दोन दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संधी न मिळाल्याने नगरसेवक रवी लांडगे यांनी स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज केशव घोळवे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिल्याने सत्ताधारी भाजपमध्ये निवडणुकीपूर्वी राजीनामा सत्र सुरु झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. घोळवे यांची उपमहापौर पदी अचानक आणि अनपेक्षितपणे निवड झाली होती. तशाच अचानक पद्धतीने त्यांनी राजीनामाही दिला आहे. यामुळे आता उर्वरित अकरा महिन्यांसाठी शहराचा नवीन उपमहापौर कोण याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.