श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील टाकळीभान येथे निवडणूक भरारी पथकाने १ लाख १९ हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. रविवारी दुपारी पावणेतीन वाजता ही कारवाई करण्यात आली.
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी दिनकर सचिन सुरेश यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत पथकाने ही कारवाई केली आहे. नियमित तपासणी करत असताना नेवासा-श्रीरामपूर रोडवर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या गाड्यांची तपासणी करत असताना एका चारचाकी गाडीतून ही रक्कम हस्तगत करण्यात आली.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ५० हजार रुपयांच्या वरील रकमेचा हिशोब संबंधितास व्यवस्थित न देता आल्यास ही रक्कम जमा करण्यात येते. शिर्डी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी दंडाधिकारी दिनकर सचिन सुरेश यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई अमोल लांडे, सोमनाथ बलमे यांच्या पथकाने ही कारवाई केली.