मंचर (प्रतिनिधी) – एकलहरे (ता. आंबेगाव) येथे विवाहाच्या साक्षी गंध कार्यक्रमात नवदांपत्याने लग्न मंडपात मतदानाचे संकल्प पत्र भरून दिले. मतदानाच्या दिवशी नक्की मतदान करण्याचा संकल्प केल्याची माहिती आंबेगाव विधानसभा मतदार संघाच्या मतदार जनजागृती पथकाचे प्रमुख सुनील भेके यांनी दिली.
आपल्या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींनी राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार बजवावा यासाठी शिरूर लोकसभा मतदार संघ अंतर्गत आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार संजय नागटिळक, स्वीप नोडल अधिकारी सविता माळी, निवडणूक नायब तहसीलदार सचिन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती अभियान सुरू आहे.
येत्या १३ मेला शिरूर लोकसभा मतदार संघात मतदान होत असून मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून आंबेगाव स्वीप पथकाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.
त्याअंतर्गत हॉटेल रविकिरण एकलहरे येथे रविवार, दि. २८ रोजी आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या उर्मिला प्रदीप खानविलकर (रा. अंबरनाथ) यांचे सुपुत्र प्रणव व ज्येष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील (रा. निरगुडसर ) यांची सुकन्या यशल यांच्या साक्षीगंध कार्यक्रमप्रसंगी नववधूवराने लोकसभा निवडणुकीत मतदान करणार असल्याबाबत संकल्पपत्र भरून मतदान करण्याचा संकल्प केला. या वेळी उपस्थित २७५ वऱ्हाडी मंडळी यांना मतदार मार्गदर्शिका वाटप करून त्याविषयी नायब तहसीलदार सचिन वाघ यांनी मार्गदर्शन केले.
मंडपातच घेतली वऱ्हाडींनी शपथ
तसेच नववधूवरासह उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळींना येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणार असल्याबाबत सुनील भेके यांनी मतदान संकल्प शपथ दिली. या कार्यक्रमानंतर सर्व वऱ्हाडी मंडळीनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला. या वेळी नायब तहसीलदार सचिन वाघ, मतदार जनजागृती पथकाचे प्रमुख सुनील भेके, अशोक लोखंडे, नारायण गोरे उपस्थित होते.