West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जींनी घोषित केले 291 उमेदवार

कोलकाता – तृणमुल कॉंग्रेसच्याप्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज आपल्या पक्षाच्या 291 उमेदवारांची यादी एकाच फटक्‍यात जाहीर करून विरोधकांवर आघाडी घेतली आहे. उर्वरीत तीन जागा गोरखा जनमुक्ती मोर्चाला देण्यात आल्या आहेत त्यामुळे सर्व 294 जागांचा निर्णय पक्षाने पुर्ण केला आहे.

या यादीतून 23 ते 24 आमदारांना वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी महिला व युवकांना संधी देण्यात आली आहे. या यादीत 50 महिला, 42 मुस्लिम, 79 अनुसुचित जाती, 17 अनुसुचित जमाती च्या उमेदवारांना तृणमुल कॉंग्रेसने संधी दिली आहे. ही यादी जाहीर केल्यानंतर ममतांनी म्हटले आहे की यंदाची ही निवडणूक आमच्यासाठी सर्वात सोपी निवडणूक आहे.

त्या म्हणाल्या की पक्षात काम करणाऱ्या प्रत्येकालाच या यादीत संधी देता येणे आम्हाला शक्‍य नाही. तथापि ज्येष्ठांना संधी देण्यासाठी आणि त्यांचे सरकार चालवण्याकामी मार्गदर्शन घेण्यासाठी राज्यात विधान परिषद स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत तेथे पक्षातील ज्येष्ठांना संधी देता येईल असे त्यांनी नमूद केले.

या यादीत स्वत: ममता बॅनर्जी यांना नंदीग्राम मतदार संघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यांच्या पुर्वीच्या भवानीपोरे मतदार संघातून सोवनदेव चट्टोपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मोदी आणि शहा यांना आव्हान देताना त्यांनी म्हटले आहे की त्यांनी त्यांना वाटेल तितक्‍या केंद्रीय सुरक्षा दलांच्या तुकड्या या राज्यात तैनात कराव्यात पण आमचा विजय त्यांना रोखता येणार नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.