कोविड रुग्णांसाठी 200 बेड होणार उपलब्ध; रुग्णसंख्या वाढल्याने निर्णय
पिंपरी – करोना रूग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढू लागल्याने नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलात 200 बेडचे जम्बो करोना रूग्णालय दोन महिने कालावधीसाठी सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सध्या महापालिकेमार्फत ऑटो क्लस्टर येथे 200 बेडचे कोविड रुग्णालय सुरू आहे. तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील 15 बेडचे दोन आयसीयू ऑगस्ट 2020 पासून कोविड रुग्णांसाठी राखीव आहेत.
महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच इतर पदाधिकारी, अधिकारी यांची 22 मार्च 2021 रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी जम्बो रुग्णालयातील 200 बेड करोना रुग्णांसाठी दोन महिने कालावधीसाठी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या रूग्णालयात 100 बेड ऑक्सिजन युक्त, 50 आयसीयू, 50 एचडीयू या प्रमाणे सुरू करण्यात यावेत, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
पीएमआरडीएने पूर्वीच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे कामकाज करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार, अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलासाठी जेस आयडिया यांच्यासमवेत 100 बेड ऑक्सिजन युक्त, 50 आयसीयू, 50 एचडीयू या प्रमाणे दोन महिन्यांसाठी करारनामा करण्यात येणार आहे. या दोन महिन्यांसाठी 3 कोटी 77 लाख 60 हजार रूपये खर्च होणार आहे.
घरकुलच्या इमारतीत करोना केअर सेंटर
चिखली घरकुल येथील डी – 5 आणि डी – 6 या दोन इमारतींमध्ये ऑगस्ट महिन्यात 200 बेडचे करोना केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. आयकॉन हॉस्पिटल यांना 7 ऑगस्ट 2020 रोजी एका इमारतीतील 200 बेडसाठी प्रति दिन प्रति बेड 543 रूपये या दराने कामाचे आदेश देण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्यात करोना बाधितांची संख्या कमी झाल्याने 15 ऑक्टोबर 2020 रोजी या इमारतींमधील करोना केअर सेंटर बंद करण्यात आले होते. मात्र, आता करोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने पुन्हा दोन महिने कालावधीकरिता करोना केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आयकॉन हॉस्पिटल यांना 22 मार्च ते 21 मे 2021 या दोन महिने कालावधीसाठी करोना केअर सेंटर चालविण्यास देण्याबाबत कामकाज आदेश देण्यात आले आहेत. एका इमारतीसाठी 66 लाख 24 हजार रूपये खर्च होणार आहे. त्यानुसार, दोन इमारतींसाठी 1 कोटी 32 लाख 49 हजार रूपये खर्च होणार आहे. करोना केअर सेंटर मुदतीपूर्वी बंद केल्यास उर्वरित दिवसांचे बिल 80 टक्क्यांऐवजी 65 टक्के देय राहणार आहे.
मनुष्यबळासाठी 3 कोटी 33 लाख
अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील 200 बेडच्या जम्बो करोना रूग्णालयासाठी मेडब्रोज हेल्थकअर डायग्नोस्टीक सेंटर यांनाही दोन महिने कालावधीसाठी काम देण्यात येणार आहे. त्यामध्ये ऑक्सिजन युक्त 100 बेडसाठी 84 लाख 26 हजार रूपये, 50 आयसीयू बेडसाठी 1 कोटी 31 लाख 57 हजार रूपये आणि 50 एचडीयू बेडसाठी 1 कोटी 15 लाख 31 हजार रूपये असा एकूण 3 कोटी 33 लाख 16 हजार रूपये खर्च होणार आहे. मेडब्रोज हेल्थकेअर यांच्याकडून मनुष्यबळ उपलब्ध करून घेतले जाणार आहे. रूग्णांना जेवण महापालिकेमार्फत पुरविण्यात येणार आहे.
बेडचे प्रति दिनानुसार दर
ऑक्सिजन युक्त बेड – 1404.48 रूपये प्रति बेड प्रति दिन
एचडीयू बेड – 3843.84 रूपये प्रति बेड प्रति दिन
आयसीयू बेड – 4385.92 रूपये प्रति बेड प्रति दिन