शहरातील विविध सामाजिक संघटनांसह विरोधकांचा प्रश्न
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने आपल्या महापौरांसाठी वीस लाखांचे “इनोव्हा’ हे वाहन थेट पद्धतीने खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, या विषयाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. करोनाकाळात आणि महापालिका आर्थिक अडचणीत असताना घेतलेल्या या निर्णयावर “भाजपा’चा एकही नेता “ब्र’ शब्द काढत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वाहन खरेदीची तातडीची गरज नसल्याने हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे.
महापालिकेत सन 2017 साली भाजपाची सत्ता आली होती. सत्तेत आल्यानंतर महापौरांसाठी “इनोव्हा’ ही गाडी खरेदी करण्यात आली होती. या खरेदीला केवळ चार वर्षे पूर्ण झाले असून, ही गाडी अद्यापही सुस्थितीत आहे. असे असतानाही आता महापौरांसाठीच नवीन गाडी घेण्याच्या विषयाला आयत्यावेळी स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.
डिसेंबर महिन्यात राज्य शासनाने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासाठी इनोव्हा हे वाहन खरेदी केले होते. तात्कालीन परिस्थितीमध्ये भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह राम कदम यांनी राज्य शासनावर प्रचंड टीका करत हा विषय राज्यपातळीवर उचलून धरला होता.
शिक्षणमंत्र्यांकडे असलेली गाडी जुनाट होती. त्यांना राज्यभर दौरे करावे लागत असल्याचे कारण राज्य शासनाने त्या वेळी पुढे केले होते. यानंतरही सुमारे महिनाभर भाजपानेते टीकेची झोड उठवित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपानेच अवघ्या चार वर्षांत नवीन घेतलेल्या वाहनाबद्दल मात्र हे नेते गप्प का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
विरोधकांची सत्ता असल्यास वेगळी भूमिका आणि भाजपाची सत्ता असल्यास वेगळी भूमिका या पक्षाकडून घेतली जात असल्याचाही प्रकार या निमित्ताने पुढे आला आहे. स्थानिक नेतेमंडळींनी करोनाकाळात घेतलेला हा अनावश्यक खर्चाचा निर्णय रद्द करण्यासाठी फडणवीस, दरेकर, कदम पुढाकार घेतील का? असा प्रश्न विविध सामाजिक संघटनांकडून केला जात आहे.
विरोधकांकडूनही “चुप्पी’
राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी आतापर्यंत तरी या निर्णयाला विरोध केलेला नाही. शिक्षणमंत्र्यांच्या वाहनखरेदीवर चिखलफेक करताना अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांवरही त्यावेळी टीका झाली होती. अजित पवारांचे “पाईक’ म्हणवून घेणाऱ्या शहरातील एकाही नेत्याने याबाबत आक्षेप न घेतल्यानेही आश्चर्य व्यक्त होत आहे.