कामशेत, दि. 6 (वार्ताहर) -स्वच्छ आणि सुंदर शहर ठेवण्याचा संकल्प मावळ तालुक्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी साकारण्याचा प्रयत्न केला जात असला तरी जुना पुणे-मुंबई महामार्ग व तालुक्यातील अनेक रस्ते कचऱ्याचे हब बनू पहात आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले असून, सकाळी बाहेर पडल्यानंतर कचऱ्याचे दर्शन होत असल्याने मावळातील नागरिकांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. बेजबाबदार वर्तन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
मावळ तालुक्यात लोणावळ, तळेगाव दाभाडे या नगरपालिका असून वडगाव ही नगरपंचायत आहे. या तीनही स्थानिक स्वारज्य संस्थांकडून कचरा संकलनासाठी प्रभावपणे काम केले जाते. मात्र, या स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतींच्या हद्दीत व हद्दीलगत वेगाने होणाऱ्या नागरीकरणामुळे प्रत्येक नागरीवस्ती अथवा सोसायटीत कचरा संलनासाठी घंटागाडी नेणे काहीसे अडचणीचे ठरत आहे.
दरम्यान, कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण करण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होईल, अशी कल्पना होती, पण मावळातील नागरिकांनी फोल ठरवली आहे. रस्त्यावर कचरा जमा होणार नाही याची दक्षता बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था घेताना दिसतात. दिवसभरातून एकदा तरी कचरा संकलनासाठी घंटागाडी फिरत असून, या गाडीत सोसायटी अथवा परिसरातील कचरा टाकण्याचे आवाहन केले जाते, मात्र याकडे अनेकजण दुर्लक्ष करून मोकळ्या रस्त्यावर कचरा फेकतात. त्या त्याठिकाणी कचरा फेकण्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते, असे फलक लिहूनदेखील नागरिक फलकाकडे कानाडोळा करतात.
मावळात महामार्गालगतची रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स, चायनीज खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल्स यामधील खरकटे, शिळे अन्न पदार्थ, भाज्यांचे देठ, अनावश्यक पदार्थ सर्रासपणे जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत टाकले जात आहेत. त्यामुळे महामार्गावरून प्रवस करताना, तसेच नाणे, आंदर मावळात प्रवेश करताना अनेकठिकाणी नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
कामाची व घंटागाडीच्यावेळेची चुकामूक
मावळातील शहर व ग्रामीण भागात कचरा संकलनासाठी प्रयत्न केले जात असले, तरी अनेक नोकरदारांचे वास्तव्य असलेल्या भागात संकलनासाठी येणारी घंटागाडी व नोकरदारांची घरात असल्याची वेळ याचे गणित जुळत नाही. त्यामुळे कामावर निघाताना अनेक जण सोबत घेतलेली कचऱ्याची पिशवी रस्त्यालगत भिरकवत असल्याचे चित्र सर्रासपणे दिसत आहे.