महिनाभरात वसुलीचे अवघड आव्हान : 426 कोटी वसूल, 324 कोटी बाकी
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये 5 लाख 41 हजार 536 मिळकतधारक आहेत. त्यापैकी निम्म्या मिळकतधारकांनी अद्याप कर भरला नाही. एकूण 2 लाख 70 हजार 91 मिळकतधारकांनी कराचा भरणा केला आहे. तर 2 लाख 71 हजार 445 मिळकतधारकांकडून करवसुली करणे बाकी आहे. विशेष म्हणजे मार्चअखेर पर्यंत या मिळकतधारकांकडून बिले वसूल करायची आहे.
करोनामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. उत्पन्न वाढीसाठी करसंकलन विभागाला करवसुलीचे टार्गेट आहे. 2020-21 हे अर्थिक वर्ष संपण्यास केवळ मार्च महिना बाकी आहे. त्यामुळे मार्चअखेर पर्यंत जास्तीत जास्त कर वसूल करण्यासाठी महापालिकेचा कर संकलन विभाग कामाला लागला आहे.
आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शहरातील 2 लाख 70 हजार 91 मिळकतधारकांनी कर भरला आहे. त्याची एकूण रक्कम 426 कोटी 31 लाख 49 हजार 83 इतकी आहे. तर अद्याप 2 लाख 71 हजार 445 मिळकतधारकांकडून 324 कोटी रुपयांचा कर वसूल होणे बाकी आहे. या अर्थिक वर्षामध्ये करसंकलन विभागाला 750 कोटी वसुलीचा टप्पा पूर्ण करायचा आहे. मार्च महिन्यात तब्बल 324 कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान करसंकलन विभागासमोर आहे.
दरम्यान, शास्तीकर वगळून मूळ व थकीत मिळकतकर भरण्यास 31 मार्चपर्यंत सवलत देण्यात आली आहे. आतापर्यंत शास्तीकर वगळून 2 हजार 792 जणांनी एकूण 33 कोटी 32 लाखांचा भरणा केला आहे. नागरिकांनी मूळ मिळकतकर भरावा तसेच नियमित कर भरून महापालिकेला सहकार्य करावे.
ऑनलाइन कर भरण्यास पसंती
ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांनी पसंती दिली आहे. 1 लाख 70 हजार 751 जणांनी ऑनलाइन बिल भरले आहे. ही रक्कम 214 कोटी 52 लाख 72 हजार 650 इतकी आहे. आरटीजीएसने 107 जणांनी 13 कोटी 88 लाख 37 हजार 371 रुपये भरले आहे. रोख स्वरुपात 79 हजार 76 जणांनी 75 कोटी 61 लाख 96 हजार 603, धनादेशाद्वारे 22 हजार 657 जणांनी 107 कोटी 7 लाख 77 हजार 82 रुपये भरले आहे. तर डीडीने 262 जणांनी 7 कोटी 63 लाख 19 हजार 712 इतका भरणा केला आहे. नवीन आलेल्या स्वाईप मशिनकडे मिळकतधारकांनी कानाडोळा केला आहे. कार्ड स्वाईपचा अवघ्या 3 जणांनी लाभ घेतला असून 22 हजार 713 रुपयांचा भरणा केला आहे.
325 मिळकतधारकांना जप्तीपूर्व नोटीस
25 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या 325 मिळकतधारकांना पालिकेने जप्तीपूर्व नोटीस दिल्या आहेत. कारवाईसाठी पथक गेल्यानंतर अनेक मिळकतधारक बिल भरत आहेत. मात्र जे मिळतकधारक नोटीस बजावूनही कर भरणार नाही त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा इशारा करसंकलन विभागाने दिला आहे.
नागरिकांनी 31 मार्चपर्यंत थकीत मूळ मिळकतकर भरावा तसेच नियमित कर भरून महापालिकेला सहकार्य करावे. नागरिकांना कर भरण्यासाठी सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारीही करसंकलन कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहे.
– स्मिता झगडे, उपायुक्त, करसंकलन विभाग.