पिंपरी-चिंचवड : पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक शांततेत

मतदान केंद्र दूर अंतरावर असल्याने मतदारांची धावपळ

पिंपरी – पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ तालुक्‍यात मंगळवारी (दि. 1) शांततेत मतदान पार पडले. मतदान केंद्र दूर-दूर अंतरावर असल्याने मतदारांची चांगलीच धावपळ उडाली. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक केंद्रावर “फिजिकल डिस्टंसिंग’ आणि पुरेशा सुरक्षा साधनांचा अवलंब करीत मतदान पार पडले.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज निवडणूक झाली. पिंपरी-चिंचवड शहरात 13 शाळांमधील 45 बूथवर मतदानाची सोय करण्यात आली होती. शिक्षक असलेल्या अनेक मतदारांना दोन वेगवेगळी केंद्र देण्यात आली. मतदारांसाठी केंद्र देताना मतदारांना घराजवळ केंद्र देणे अपेक्षित होते. मात्र, घराजवळ केंद्र न मिळाल्याने मतदारांना मतदान करण्यासाठी लांब अंतरावरील केंद्रावर जावे लागले.

पिंपरी-चिंचवड परिसरात 22 हजार 500 जणांचे मतदान होते. वडगावशेरी, वाघोली, कोथरूड येथील 8 हजार 900 जणांचे मतदान पिंपरीत होते. तर, पिंपरीतील 3 हजार 400 जणांचे मतदान पुण्यात होते. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरवात झाली.

प्रत्येक मतदान केंद्रावर करोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सॅनिटायझेशन, शारिरीक तापमान मोजण्याची यंत्रणा ठेवण्यात आली होती. त्याशिवाय, मतदारांना फिजिकल डिस्टंस ठेवण्याबाबत सूचना देण्यात येत होत्या. सकाळी 8 ते 11 या वेळेत तुलनेत चांगला प्रतिसाद होता. त्यानंतर 11 ते दुपारी 3 च्या दरम्यान मतदानासाठी बाहेर पडणाऱ्या मतदारांचे प्रमाण घटले. दुपारी 3 नंतर पुन्हा मतदानाला प्रतिसाद वाढला. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात दुपारी 4 वाजेपर्यंत 49.52 टक्‍के तर, पुणे शिक्षक विभाग पदवीधर मतदारसंघात 67.36 टक्‍के इतके मतदान झाले होते.

केंद्र बदलल्याने उडाली धावपळ
पिंपरी वाघेरे येथील महात्मा फुले शाळा येथील मतदान केंद्र बदलून चिंचवड स्टेशन येथील महात्मा फुले शाळेत करण्यात आले. त्यामुळे मतदारांची चांगलीच धावपळ उडाली. त्यांना मतदान केंद्र शोधता शोधता नाकीनऊ आले.

मतदारांचे नाव शोधण्याची व्यवस्था
मतदारयाद्या आणि “मोबाईल ऍप’च्या माध्यमातून राजकीय पक्षांच्या वतीने मतदारांना मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र क्रमांक शोधून देण्याची व्यवस्था मतदान केंद्रांजवळ करण्यात आली होती. त्याशिवाय, केंद्रांवर देखील मतदान सहायता कक्ष करण्यात आले होते. त्या माध्यमातून मतदारांना मतदान यादीतील त्यांचे नाव शोधून देण्याची व्यवस्था केलेली होती.

उमेदवार आणि आमदारांचे मतदान
मनसेचे पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार विद्यानंद मानकर यांनी भोसरीतील राजमाता जिजाऊ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केले. आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी देखील राजमाता जिजाऊ विद्यालयातील मतदान केंद्रावर आज मतदानाचा हक्क बजावला. कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते यांनी पिंपरीतील महापालिकेच्या मुलांच्या हिंदी शाळेत मतदान केले. कथाकार राज अहेरराव यांनी चिंचवड-केशवनगर येथील महापालिकेच्या शाळेत मतदानाचा हक्क बजावला.

‘मी राहण्यासाठी निगडीला असले तरी माझे 30 ते 32 किलोमीटर अंतरावरील वाघोली येथील मतदान केंद्रावर नाव आले. एवढ्या लांब अंतरावर नाव आले असले तरीही त्याचा विचार न करता निगडी येथून वाघोलीला जाऊन मतदान करून परत घरी आले. मतदानाच्या कर्तव्यपूर्तीचे समाधान मला मिळाले.”
– शारदा भास्कर रिकामे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.