पिंपरी – मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग गुरुवारी (दि. 23) पुन्हा दोन तास बंद राहणार आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी 35/500 येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. गुरुवारी (दि. 23) दुपारी 12 ते 2 या वेळेत या लांबीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे.
या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने मॅजिक पॉइंट किमी क्रमांक 42/100 येथून वळवून राज्य महामार्ग क्रमांक 48 जुना मुंबई – पुणे महामार्गावरून खोपोली शहरातून शेडुंग टोल नाका येथे अथवा खोपोली शहरातील इंदिरा चौकातून द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरून मुंबईकडे मार्गस्थ करण्यात येतील.
तसेच पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिट किमी क्रमांक 39/800 येथून वळवून राज्य महामार्ग क्रमांक 48 जुना मुंबई – पुणे महामार्गावरून खोपोली शहरातून शेडुंग टोल नाका येथे अथवा खोपोली शहरातील इंदिरा चौकातून द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरून मुंबईकडे मार्गस्थ करण्यात येतील.
गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी 2 वाजता द्रुतगती मार्गावरील पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान ब्लॉक कालावधीत वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 9822498224 वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या दूरध्वनी क्रमांक 9833498334 वर संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.