पिंपरी – पिंपरी-चिंचवड मधील भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक एकनाथ पवार यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते आणि प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत कारण दिले. रविवारी (दि.22) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली.
पवार म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजातील युवक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही मराठा समाजाचे नेते असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशेजारी बसून ठोस निर्णय घेत नाहीत.
आपले न्याय हक्क मागणीसाठी रस्त्यावर उतरलेला महाराष्ट्रातील मराठा समाज त्यांना कदापीही माफ करणार नाही. महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना मी सत्तेचा कुठलाही लोभ न ठेवता राजीनामा देत आहे. माझी राजकीय भूमिका मी 27 तारखेला जाहीर करेन, असे पवार म्हणाले.
जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी 9 सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पिंपरी चिंचवड शहर बंद असताना झालेल्या सभेत मी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा जाहीर केला होता. त्याच वेळी मी भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेईन, असे जाहीर केले होते, असे पवार म्हणाले. जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टीमेटम दिला असतानाही सरकार वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप एकनाथ पवार यांनी केला.