पेट्रोल पंपाशेजारी साकारणार नवी इमारत; सर्वच विभाग एकाच छत्राखाली येणार
कोरेगाव – ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तसेच सामान्य लोकांची कामे एकाच छताखाली तालुक्याच्या मुख्यालयात केली जावीत, या हेतूने पंचायत समितीची रचना करण्यात आली. कोरेगाव तालुक्याच्या पंचायत समितीची इमारत मोडकळीस आली असून नवीन सुसज्ज व प्रशस्त इमारत बांधण्यासाठी महायुती सरकारने 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
सातारा- लातूर महामार्गावर पेट्रोल पंपाशेजारी ही इमारत उभारली जाणार असून, सर्वच विभाग एकाच छत्राखाली आणण्यात येणार आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीशमहाजन यांनी या इमारतीला तत्वत: मान्यता दिली आहे. आमदार महेश शिंदे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजिता पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी खेचून आणला आहे. तसेच कोरेगाव पंचायत समिती इमारतीसाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विशेष सहकार्य केले. कोरेगाव तालुका उत्तर ते दक्षिण असा 80 किलोमीटर परिघात पसरला आहे.
एका बाजूला पूर्ण बागायती क्षेत्र तर दुसऱ्या बाजूला दुष्काळ अशी या तालुक्याची परिस्थिती आहे.स्वतंत्र पंचायत समितीद्वारे ग्रामविकास विभागाचा कारभार चालतो आहे. सुमारे 60 वर्षे जुनी असलेली इमारत सध्या वापरात आहे. मोडकळीस आलेल्या इमारतीतून ग्रामपंचायत, दिव्यांग कल्याण, पशुसंवर्धन विभाग, घरकूल, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, आरोग्य विभागाचा कारभार चालत होता. कृषी विभागाला तर स्वतंत्र जागा नाही. सभापती निवास इमारतही मोडकळीस आली असली तरी त्यातून बहुतांश विभागाचा कारभार चालविला जात होता. कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था व पार्किंग सुविधा देखील नव्हती.
आमदार महेश शिंदे यांनी इमारतीचा आढावा घेतला. अनेक विभागांची पाहणी केली, त्यानंतर त्यांनी थेट गिरीश महाजन यांना मोबाइलवरुन कॉल करत पंचायत समितीची विदारक अवस्था दाखवून दिली होती. त्यांनी ग्रामविकास विभागाच्या उ च्चपदस्थ अधिकाऱ्यांना पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. आमदार महेश शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे सातारा जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी परिपूर्ण प्रस्ताव व अंदाजपत्रक सादर केले होते. त्यास मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ मान्यता दिली.
पुढील 50 वर्षांचा विचार करुन इमारतीची उभारणी
या होणारया इमारतीसाठी जागतिक दर्जाच्या इमारतींचे डिझाईन तयार करुन घेण्यात आले आहे. पुढच्या 50 वर्षांचा विचार करुन नवनवीन सुविधा दिल्या जाणार आहेत. भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञान, संगणक प्रणाली विचारात घेण्यात आली आहे. नव्याने तयार होणारे विभाग आणि पदे, वाहनांचे पार्किंग आणि कचरा निर्मूलन यादृष्टीने विशेष सोय या इमारतीमध्ये करण्यात येणार आहे.