नव्याने 94 रुग्णांची नोंद; 104 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज दिवसभरात आठ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर नवीन 94 रुग्णांची नोंद झाली. शहरामध्ये आतापर्यंत 96हजार 137 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 92 हजार 779 रुग्ण बरे झाले आहेत.
रविवारी (दि. 27) दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 94 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची आज नोंद झाली नाही. आज दिवसभरात 8 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 5 व शहराबाहेरील 3 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील पिंपरी, भोसरी, तळवडे व दिघी येथील 5 जणांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील तळेगाव दाभाडे, चाकण व जुन्नर येथील 3 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2470 झाली आहे.
तर आज दिवसभरात 104 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 92 हजार 779 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2 हजार 20 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी अद्याप 1421 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 766 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 842 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1608 इतकी आहे.