पुणे – शहरातील बस स्थानकांची स्वच्छता, सौंदर्य आणि सुविधांचे व्यवस्थापन यासंदर्भातील तक्रारी नोंदविण्यासाठी प्रवाशांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शहरातील स्वयंसेवी संस्थाकडून केला जात आहे. यासाठी प्रत्येक बस स्थानकावर “क्यूआर कोड’ उपलब्ध करून देण्याबाबत हालचाली सुरू आहेत, अशी माहिती “नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी’च्या अध्यक्ष श्यामल देसाई यांनी दिली.
स्वच्छतेसाठी नेहमीच प्रत्नशील असलेल्या या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणे, कचरा संकलन करणे अशी विविध कामे केली जातात. नुकतेच संस्थेतर्फे शहरातील बस स्थानकांची स्वच्छता आणि सुव्यवस्था याबाबतचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी विविध संकल्पनांवर काम सुरू आहे.
त्यातूनच तक्रार कक्ष स्थापन करून, शहरातील बस स्थानकांवर “क्यूआर कोड’ची व्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत काम सुरू आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणेशी चर्चा सुरू असल्याचेही देसाई यांनी सांगितले.
या क्यू आर कोडमुळे प्रत्येक भागातील नागरिक, प्रवासी संबंधित बस स्थानकासंदर्भातील तक्रारी नोंदवू शकतील. त्यानुसार संबंधित प्रशासकीय यंत्रणा त्या तक्रारींचे निवारण करण्यासंदर्भात काम करू शकतील. एकूणच या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना या कामाशी जोडून घेता येईल, तसेच नागरिकांच्या सहभागामुळे बस स्थानकांची स्वच्छता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली.