पिंपरी (प्रदीप लोखंडे) – दर्जेदार शिक्षण देण्याचा दावा करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाला महापालिका शाळांमधील पटसंख्या वाढविण्यात अपयश आले आहे. गेल्या दोन वर्षात प्राथमिक शाळेतील विद्यार्थी संख्येत केवळ 247 विद्यार्थ्यांची भर पडली आहे. यावरुन शिक्षण विभाग पालकांना महापालिकेच्या शाळांच्या गुणवत्ता पटवून देण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.
शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून पालकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची आकडेवारीच वाढताना दिसत नसल्याची संख्या महापालिकेनेच जाहीर केलेल्या पर्यावरण अहवालाद्वारे स्पष्ट झाली आहे.
शहरात प्राथमिक शाळांची संख्या 105 आहे. तीन वर्षांत एकही शाळा वाढलेली नाही. प्राथमिक शाळेत दोन वर्षात केवळ 247 विद्यार्थी वाढले आहेत. 2019-20 वर्षात 39 हजार 374 एवढी विद्यार्थी संख्या होती. 2020-21 मध्ये ही संख्या केवळ 100 ने वाढली. या वाढलेल्या संख्येनुसार विद्यार्थी संख्या 39 हजार 483 इतकी झाली आहे. तर 2021-22 मध्ये 39 हजार 630 विद्यार्थी संख्या झाली असून या वेळी 147 विद्यार्थी वाढल्याची नोंद आहे. दोन्ही वर्षांतील ही संख्या तोकडी असल्याचे स्पष्ट होत आहे.
कार्यशाळा, प्रशिक्षणात व्यस्त
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या कार्यशाळेचा धडाका लावला जातो. शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे. सातत्याने या प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन केले जात आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी किती होते, विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात का वाढत नाही, याची कोणतीही नोंद संबंधीत विभाग ठेवताना दिसत नाही. त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. या बरोबरच शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
तीन वर्षांतील विद्यार्थ्यांची आकडेवारी