पिंपरी – राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ असा नारा देत सरकारी कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, निगडी आणि भोसरी शिधापत्रिका कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. सरकारी कर्मचा-यांनी गुरुवारपासून (दि. १४) संप पुकारल्याने तेथील कामकाज ठप्प पडले आहे.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मार्चमध्ये सर्व सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते. संप मागे घेताना समिती नेमली होती. तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, आठ महिने होऊनही कोणताही निर्णय न झाल्याने सरकारी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यामुळे संतप्त कर्मचार्यांनी संपाचे हत्यार उपसले. दरम्यान, शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय, निगडी व भोसरी शिधापत्रिका कार्यालयातील बहुतांश तर, पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या सर्व कार्यालयांच्या परिसरात शुकशुकाट दिसून येत होता. विविध कामासाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती घरी जावे लागले.
पालिका कर्मचार्यांची संपाकडे पाठ
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी या संपाकडे पाठ फिरवली आहे. गुरुवारी झालेल्या संपात महापालिकेतील एकही कर्मचारी सहभागी झाला नाही. यासंदर्भात राज्य सरकारशी बोलणे सुरू आहे. तसेच, याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने दिली आहे.