लोकसभा निवडणूकांबाबत ममता बॅनर्जींचा मोठा दावा; भाजपला किती जागा मिळणार केले स्पष्ट

Lok Sabha Election 2024| यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप मित्रपक्षांसह 400 चा आकडा पार करेन असा नारा दिला जात आहे. यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील सध्याच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला 543 जागांपैकी 195 पेक्षा जास्त जागा मिळणार नसल्याचा दावा केला आहे. याशिवाय निवडणुकीनंतर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी ?
ममता बॅनर्जी यांनी काल पश्चिम बंगालमधील परगणा जिल्ह्यातील बोनगाव आणि बराकपूर मतदारसंघात दोन सभा घेतल्या. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी बंगाल पूर्ण पाठिंबा देईल. आम्हाला काही नको, फक्त लोकांना जगू द्या. देश वाचला पाहिजे जेणेकरून लोक शांततेत राहतील. देश, संविधान आणि माणुसकी विकली जाऊ नये. इतकेच आम्हाला पाहिजे आहे.”
नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत त्या म्हणाल्या, “लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. आता नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, याची जाणीव त्यांना झाली आहे. त्यांचा चेहरा बघा, त्यावर हे स्पष्ट दिसेल की, आता इंडिया आघाडी जिंकेल, मोदी नाही. भाजपला केवळ195 जागा मिळतील. उर्वरित जागा इंडिया आघाडी आणि छोट्या पक्षांना मिळतील,” असा दावाही यावेळी ममता बॅनर्जी यांनी केला.
पुढे त्या म्हणाल्या की, “आता ते त्यांची गॅरंटी देत आहे. 10 वर्षे कुठे होते? तुम्ही प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये आणि दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या देणार असल्याचे सांगितले होते. या 10 वर्षात तुम्हाला 20 कोटी नोकऱ्या मिळाल्या का? मतुआ समुदायाच्या लोकांना नागरिकत्व मिळविण्यासाठी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यांतर्गत अर्ज भरावा लागेल. जर पंतप्रधानांचे मतुआंवर इतके प्रेम असेल तर त्यांनी त्यांना सीसीए फॉर्म भरण्यास न सांगता नागरिकत्व द्यावे.”
हेही वाचा:
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन ; कर्करोगाविरोधातील झुंज अपयशी





