दुतर्फा वाहनांच्या सुमारे दीड किमीपर्यंत रांगा
वाल्हे – पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील, पुणे-मिरज लोहमार्गावर, वाल्हे-नीरा दरम्यानचे थोपटेवाडी (ता. पुरंदर) हद्दीतील पिसुर्टी येथील रेल्वे फाटक क्रमांक 27 किलोमीटर 79/01 रेल्वेफाटक या रेल्वे गेटमध्ये सायंकाळच्या दरम्यान बिघाड झाल्याने, दोन्ही बाजूंना सुमारे दीड किलो मीटरच्या रांगा लागले होत्या. आगोदरच अत्यंत अरुंद रस्ता तसेच या अरुंद रस्त्याच्या बाजूने दुतर्फात सुरू असलेले रस्त्याच्या कामामुळे, अजूनच अस्रुंद झालेल्या पालखी महामार्गावरील वाहतूक थांबल्याने ऐन रहदारीच्या वेळी प्रवाशांचे हाल झाले.
पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग रुंदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. मात्र, पिसुर्टी गावांपासून नीरा शहरापर्यंतचे रुंदीकरण अद्याप प्रलंबित आहे. हा मार्ग पूर्वीप्रमाणेच राहणार असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले आहे. याच रस्त्यावरती पुणे-मिरज रेल्वे मार्गाचे रेल्वे गेट आहे. हे रेल्वे गेटमध्ये मागील काही काळापासून सतत बिघाड होत असल्याने, वाहनांच्या रांगा लागत असतात. गुरुवारी (दि. 14) सायंकाळी उशीरा येथील एक गेट नादुरूस्त झाले होते.
दरम्यान, वाल्हा बाजूकडील गेट लागून राहिले तर नीरा बाजूकडील गेट उघडेच राहिले. यामुळे वाहन चालकांनी मोठी तारांबळ झाली. ऐन रहदारीच्या वेळी असा बिघाड झाल्याने वाहन चालकांचे व प्रवाशांचे हाल होत आहेत. मागील आठवड्यात याच रेल्वे गेटमध्ये एक डंपर शिरला होता. रेल्वे गेट लागलेले असताना भरधाव डंपर थेट गेटचे दांडके तोडून रेल्वे लाइनवर आडवा झाला होता. त्यावेळी ही रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या रेल्वेगेट मधील दोन्ही लोहमार्गावरून, अनेक दुचाकीस्वार घसरून पडत असून रेल्वे प्रशासन मात्र, या घटनेकडे गांभीर्यपूर्वक पाहत नसल्याने, प्रवासीवर्गामधून नाराजीची व्यक्त होत आहे.
फाटक विरहित क्रॉसिंगचा विसर
देशभरात रेल्वेने ‘फाटक’ विरहित रेल्वे क्रॉसिंग अशी संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.; मात्र, पुणे – पंढरपूर पालखी मार्गावरील वाल्हा ते नीरा दरम्यानच्या पिसुर्टी रेल्वे गेटवर आजही जुन्या काळातील रेल्वे गेट व आता सिक्युरिटी एजन्सीचे कर्मचारी नेमले आहेत. याठिकाणी रेल्वेचे कर्मचारी नसल्याने काही बिघाड झाल्यास, दुरुस्ती करण्यास अडथळा निर्माण होत आहे.