जाधववाडी – अंतर्गत मुख्य रस्ता सुमनताई मारुती जांभुळकर कमानीजवळचा चेंबर ऐन दिवाळीत तुंबला आहे. या चेंबरमधून मैलामिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. तसेच दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाने येथील चेंबरची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मैलामिश्रित सांडपाणी रस्त्यावर सर्वत्र पसरल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे पादचारी या मार्गाने ये-जा करताना अक्षरशः नाकावर रुमाल धरून आपले कपडे सांभाळत चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. मैलामिश्रित पाणी दीपावलीपासून रस्त्यावर वाहत आहे. महापालिकेचा आरोग्य विभागाचे वाहन येऊन जात आहे पण चेंबर जैसे थेच आहे. आजही चेंबरमधून दुर्गंधी युक्त पाणी रस्त्यावर वाहत आहे.
स्वस्त धान्य दुकानाजवळच चेंबर तुंबले
ऐन दिवाळीत सर्वसामान्य नागरिक स्वस्त धान्यदुकानावर धान्य खरेदीसाठी तसेच दिवाळी शिधा घेण्यासाठी येत होते. परंतु मैलामिश्रित पाणी येथून वाहत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. येथून प्रवास करताना अनेकांच्या अंगावर मैलामिश्रित पाणी येत असल्याने वाहनचालक व नागरिकांत वाद होत आहेत.
काल ड्रेनेजलाइन साफ करण्यासाठी गाडी पाठवली होती. परंतु पुढची लाइन जॅम आहे. आजही गाडी पाठविणार आहे. जर लाइन दुरुस्त झाली नाही तर नवीन लाइन टाकून काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.
– रचना दळवी, महापालिका.
लवकरात लवकर चेंबर दुरुस्त करावा. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. येत्या दोन दिवसांत चेंबर दुरुस्त नाही झाला तर महापालिकेत आयुक्तांना या ठिकाणी घेऊन येऊ.
– किरण जांभुळकर, सामाजिक कार्यकर्ते.