सातारा – मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. मात्र, ते मिळू नये यासाठी वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय षडयंत्र रचले जात आहे. महाराष्ट्रामध्ये 1963 पूर्वीचे कुणबी दाखले सापडण्यास सुरुवात झाली आहे, म्हणजे मराठ्यांना आरक्षण होते हे सिद्ध झालेले आहे. ते आरक्षण मिळून न देणाऱ्या राजकीय नेतृत्वाला जाब विचारण्याची वेळ आली आहे. 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घ्यायचाच आहे. सकल मराठा समाजाने 70 टक्के लढाई जिंकलेलीच आहे. ज्यांचे दाखले मिळाले आणि ज्यांचे दाखले मिळाले नाही अशांमध्ये भांडण लावण्याचे उद्योग सुरू आहेत. त्यामुळे गाफील राहू नका. मराठा समाजाने एकी दाखवून आरक्षण मिळवा आणि पुढच्या पिढ्यांचे कल्याण करा. मात्र, संयमाने परिस्थिती हाताळा, असे कळकळीचे आवाहन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यात केले.
मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीच्यावतीने येथील गांधी मैदानावर आशीर्वाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये तब्बल तीन तास उशिरा आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एकी ठेवण्याचे केलेले आवाहन आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा घेतलेला परखड समाचार हे सभेचे वैशिष्ट्य ठरले. जनतेचा पैसा खाणारा हा जेलमध्ये जाणारच मी काही गोष्टी संयमाने घेतो आहे. बेताल वक्तव्य करणारे राजकीय दंगली घडवून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, माझ्या टप्प्यात आले तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणारच, अशी कडवट टीका जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता केली.
दीड तासाच्या भाषणामध्ये जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला वारंवार एकी राखून संयम ठेवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “”मुळात आरक्षण आपण समजून घेतलं नाही. माझ्या उपोषणाच्या दणक्यामुळे न्यायमूर्ती शिंदे समिती संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करत असून आतापर्यंत राज्यात पावणेपाच लाख कुणबी दाखले आढळलेले आहेत. सातारा जिल्ह्यातही 20 हजारांहून अधिक नोंदी आढळल्या आहेत. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण होतं. मात्र, सत्ताधाऱ्यांनी ते आपल्याला मिळू दिले नाही. आरक्षण नसल्यामुळे पुढच्या पिढीचे भविष्य उध्वस्त व्हायची वेळ आली आहे. आपण केवळ अश्रू गाळण्यापलीकडे काहीच करत नव्हतो. मराठा समाजाने जागृत होऊन सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला हवा. तेच काम मी प्रामाणिकपणे करत आहे.
आता यापुढे 70 वर्षाचा अनुशेष सरकार कसा भरून काढणार हासुद्धा जाब मी विचारत आहे. 24 डिसेंबरपर्यंत सकल मराठा समाजाची कसोटी आहे. त्यामुळे गाफील राहू नका अन्यथा पुढच्या पिढीचे नुकसान होईल. मराठा व कुणबी एकच आहेत हा अहवाल सरकारने स्वीकारला आहे. सुरुवातीला हा अहवाल मराठवाड्यापुरता स्वीकारण्याची सरकारने तयारी दाखवली. मात्र, हा प्रकार म्हणजे भावंडा भावंडांमध्ये भांडण लावण्याचा प्रकार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे समितीला राज्यस्तरीय दर्जा देऊन सकल मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी आग्रही आहे. मी माझ्या मायबाप समाजाशी गद्दारी करणार नाही. प्राण गेले तरी आरक्षणाच्या मागणीसाठी मागे हटणार नाही.”अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर परखड शब्दात टीका केली होती. त्याचा जरांगे पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. जो घटनात्मक पदावर बसतो आणि जातीजातींमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करून राजकीय दंगल घडवण्याचे षडयंत्र रचतो, त्याची लायकी राज्यातील नागरिकांनी ओळखली आहे.
मी एवढा सोपा नाही, माझ्या टप्प्यात आला की मी त्याची वाजवतोच. वैचारिक मतभेद असावेत, वैचारिक विरोध करावा. मात्र, संबंधितांनी पदाची गरिमा राखून बोलावे. कायदा पायदळी तुडवणे आणि उगाच अंदाधुंद बोलणे योग्य नाही.राज्य शासन वारंवार माझं शिक्षण शोधतेय. पण आरक्षणाच्या ध्येयापासून मी ढळलेलो नाही. महाराष्ट्राचा पैसा या प्रवृत्तीने ओरबडला म्हणून त्यांना जेलवारी झाली. राज्याला शिवप्रभूंची संस्कृती आहे, महात्मा फुले यांनी राज्याला शिक्षणाचा संस्कार दिला.” आरक्षणाच्या नावाखाली जाती- जातीत दंगली घडवण्याचे षडयंत्र आहे. मात्र, यांची मनसुबे पूर्ण होऊ द्यायचे नाही याचा निर्धार संपूर्ण मराठा समाजाने करायला हवा, असे आवाहन त्यांनी केले. जरांगे पाटील यांचा समन्वयक समितीच्या वतीने शिवप्रभूंची प्रतिमा देऊन व सातारी कंदी पेढ्यांचा हार घालून सत्कार करण्यात आला.
शांतीचे ब्रम्हास्त्र धारण करुया…
आपले लक्ष नेहमी आरक्षणच्या मागणीवर हवे. आता मराठा आरक्षणाविरोधात कोण बोलला तर त्याला वाजविला, असा इशारा जरांगे यांनी देताच गांधी मैदानावर टाळ्यांचा कडकडाट झाला. 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाची कसोटी आहे. सरकार आरक्षण देणारच ही खात्री आहे. पण दिले नाही तर शांततेच्या मार्गाने मराठा समाजाने आंदोलने पुन्हा सुरू करावीत. मराठ्यांना आरक्षण द्यावे लागणार हे राज्यकर्त्यांना कळून चुकले आहे. म्हणून समितीच्या नावाखाली वेळ काढला जात आहे. शांतीचे ब्रह्मास्त्र आपण धारण करूया, मी माझ्या मराठा समाजाशी प्रामाणिक आहे. समाजाशी गद्दारी करणारी माझी पैदास नाही. आपण पुढच्या पिढीच्या पदरात आरक्षणाचे दान टाकूया याचा निर्धार करा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
आपली लढाई आपणच लढायला हवी…
काही राजकीय मंडळी आरक्षणाच्या आंदोलनामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून षडयंत्र रचली जात आहेत. माझं आंदोलन दडपण्याचा वारंवार प्रयत्न झाला. पण मी बारीक दिसत असलो तरी माझी बुद्धी आरक्षणाच्या ध्येयापासून ढळलेली नाही. मराठा समाजाच्या मदतीला कोणतेही राजकीय नेतृत्व येणार नाही. आपली लढाई आपल्याला लढायला हवी, 24 डिसेंबरनंतर आरक्षण मिळाले नाही तर सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावागावांमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शांततेच्या मार्गाने उपोषणाला बसून राज्य शासनाचे लक्ष वेधून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.