सांगवी (ज्ञानेश्वर टकले) – स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेच्या वतीने नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात विकासाची कामे करीत असताना रस्त्याच्या कडेला असणारे “पीएमपीएल’ बस शेड, बस थांबा फलक, नो पार्किंगचे फलक, पी 1, पी 2 फलक काढण्यात आले होते. विकासाची कामे पूर्ण होऊन वर्ष होत आले, तरी अजूनही प्रशासनाने “पीएमपीएल’ बस शेड, बस थांबा फलक बसविण्यात आलेला नाही. याचा नाहक त्रास प्रवाशांना, नागरिकांना, वाहनचालकांना दिवसेंदिवस सहन करावा लागत आहे.
महापालिकेच्या वतीने कृष्णा चौक ते साई चौक रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करताना येथील पीएमपीएल बस शेड काढून टाकण्यात आले होते. मात्र, रस्त्याची, पदपथाची कामे पूर्ण होऊनही पीएमपीएलचे बस शेड, बस थांबा फलक उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. विकासाची कामे करा, पण कामे पूर्ण झाल्यावर नागरिकांची तसेच प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची दखल प्रशासनाकडून घेणे अत्यावश्यक आहे.
मागील वर्षभराहून अधिक काळ कृष्णा चौक येथे पीएमपीएलचे बस शेड नसल्याने प्रवाशांना उन्हातान्हात उभे राहवे लागत आहे. त्यामुळे प्रवासी त्या ठिकाणी असलेल्या हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराच्या आत जाऊन सावलीचा आसरा घेत आहेत. मात्र, आसरा घेत असताना हॉस्पिटलचा सुरक्षारक्षक देखील प्रवाशांना बाहेर उभे राहण्यास सांगत आहेत. त्यामुळे आम्ही प्रवाशांनी कुठे उभे राहावे, का प्रवाशांनी उन्हा तान्हातच उभे राहायचे? असा प्रश्न येथील बस थांब्यावर येणारे प्रवासी करीत आहेत.
प्रवाशांना अपघाताचा धोका
या ठिकाणी सुरवातीला बस शेड होते. काही महिन्यांपूर्वी येथे नव्याने खासगी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची, नातेवाइकांची, रुग्णवाहिकांची सतत वर्दळ सुरू असते. त्यातच अनेकदा हॉस्पिटलच्या सुरक्षा भिंतीला लागून रुग्णवाहिका तासंतास उभ्या असतात. त्यातच रिक्षाचालकांची आणखी भर पडत असते. त्यामुळे पीएमपीएल बस आली असता ती रस्त्याच्या मधोमध उभी राहते. बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांना अक्षरशः रस्त्यावर जाऊन बसमध्ये चढावे लागत आहे. एखाद दिवस बस मागून येणारे दुचाकी वाहन प्रवाशांच्या अंगावर येऊन अपघात घडण्याची दाट शक्यता आहे.
आम्ही दररोज चाकरमानी बसने प्रवास करीत असतो. कधी कधी बस येण्यास उशीर झाला, तर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. बस शेड उपलब्ध करून दिल्यास उन्हापासून संरक्षण मिळेल.
– सुरेश भोई, प्रवासी
येथे बस थांबा फलक व बस शेड नसल्याने मी शोधत शोधत पुढच्या चौकात जाऊन परत आले. रस्त्याच्या कडेला अनेकजण असतात. येथे उभे असलेले बसची वाट पाहत आहेत हे मला हॉस्पिटलमुळे कळलेच नाही.
– सारिका ननावरे, प्रवासी
नवख्या प्रवाशांना सापडेना बस थांबा
येथे बस थांबा फलक व बस शेड नसल्याने नवख्या प्रवाशांना नेमका बस थांबा आहे तरी कुठे असा प्रश्न पडत आहे. येथील कृष्णा चौकात दुतर्फा बाजूस पीएमपीएलचे बस शेड, तसेच बस थांबा फलक नसल्याने ते त्वरित संबंधित महापालिका, स्मार्ट सिटी प्रशासनाने बसवावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. तसेच पी 1, पी 2 फलक बसविल्यास वाहतूक प्रशासनाकडून रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग करणाऱ्या वाहनांवर आळा बसविण्यास मदत मिळेल.