कोट्यवधींची इमारत कशासाठी : ऑनलाइन सभांसाठी देखील जावे लागते विभागीय कार्यालयात
पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाच्या सभा होतात पुण्यात
पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणावर प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वरचष्मा राहिला आहे. प्राधिकरणावर अध्यक्ष म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांचीच वर्णी लागली आहे. काही मोजकेच अध्यक्ष हे राजकीय मिळाले आहेत. प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सध्या विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे आहे. परंतु ते पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात येत नाहीत. प्रत्येक सभेला आणि अंदाजपत्रक मांडायला सुद्धा प्राधिकरणाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना पुण्याच्या विभागीय आयुक्तालयात जावे लागते. जर पिंपरी-चिंचवडचा कारभार पुण्यातूनच हाकायचा असेल, तर कोट्यवधींची इमारत शहरात कशाला बांधली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून 7 सप्टेंबर 2018 ते 3 फेब्रुवारी 2020 या कालावधीत भाजपचे पदाधिकारी सदाशिव खाडे यांच्याकडे कार्यभार होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महामंडळ आणि प्राधिकरणावरील अध्यक्ष बदलण्यात आले. त्यानंतर प्राधिकरणाच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला.
सुरूवातीला डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे प्राधिकरणाचे अध्यक्षपद होते. 1 ऑगस्ट 2020 पासून विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे प्राधिकरणाचे अध्यक्ष पद आले. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विभागीय आयुक्त कार्यालयातच प्राधिकरणाच्या सभा होऊ लागल्या आहेत. प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पाची सभा देखील पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयातच झाली होती. त्यामुळे प्राधिकरणाच्या कामकाजासाठी विभागीय आयुक्तांना वेळ मिळत नाही का, असा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागला आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सभाही पुण्यात
प्राधिकरणाची शुक्रवारी (दि. 27) झालेली सभा देखील पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयातच झाली. अध्यक्ष सौरभ राव हे सध्या कोविडमुळे “होम क्वारंटाइन’ आहेत. त्यामुळे ते या सभेसाठी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी झाले होते. कोविडमुळे अध्यक्ष स्वत: सभेला उपस्थित राहू शकत नव्हते. परंतु सभा मात्र पिंपरी-चिंचवडऐवजी पुण्यातच झाली.
कामाच्या वाढलेल्या व्यापाचा परिणाम
विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सध्या 5 जिल्ह्यांचा कार्यभार आहे. त्यामध्ये पुणे, कोल्हापुर, सांगली, सातारा, सोलापुर आदींचा समावेश आहे. त्याशिवाय, सध्या कोविडची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे देखील त्यांच्या कामाचा व्याप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. पर्यायाने, त्यांना त्यासाठी होणाऱ्या विविध सभा, बैठकांसाठी हजर राहावे लागते. त्यामुळे प्राधिकरणाच्या सभांसाठी आकुर्डीतील कार्यालयात सध्या येणे शक्य होत नसल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. तथापि, त्यांनी यापूर्वी काही सभा आकुर्डीतील प्राधिकरण कार्यालयात घेतल्या होत्या, असेही सांगण्यात आले.
प्राधिकरणाला पूर्णवेळ अध्यक्षांची गरज
प्राधिकरणाचे कामकाज पाहण्यासाठी पूर्ण वेळ लोकप्रतिनिधीत्व करणारा व्यक्ती अध्यक्ष म्हणून नियुक्त होण्याची सध्या गरज आहे. विभागीय आयुक्तांकडे सध्या प्राधिकरणाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांना त्यांच्या वाढलेल्या व्यापातून प्राधिकरणासाठी वेळ देणे जमत नसल्याने प्राधिकरणाला राजकीय अध्यक्ष मिळाल्यास सोयीस्कर होणार आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून 25 ऑक्टोंबर 2001 ते 22 ऑक्टोंबर 2004 दरम्यान बाबासाहेब तापकीर यांच्याकडे कार्यभार होता. त्यानंतर सदाशिव खाडे वगळता प्राधिकरणाला दुसरा राजकीय अध्यक्ष मिळालेला नाही. दिलीप बंड, नितीन करीर, प्रभाकर देशमुख, विकास देशमुख, एस.चोक्कलिंगम, चंद्रकांत दळवी, अनिल कवडे, डॉ. दीपक म्हैसेकर आणि सध्या सौरभ राव या अधिकाऱ्यांकडेच प्राधिकरणाचे अध्यक्ष पद राहिले आहे.
प्राधिकरणाच्या शुक्रवारी (दि. 26) झालेल्या सभेला विभागीय आयुक्त सौरभ राव हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते. त्यासाठी हवा असलेला “सेटअप’ आयत्या वेळी उभारणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही आमच्या सोयीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयात गेलो होतो.
– बन्सी गवळी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण.