पिंपरी – नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी महापालिकेने जाधववाडी दवाखाना हा हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून 1 मे पासून कार्यान्वीत करण्यात आला आहे. त्यामध्ये बहुतांश आरोग्य सेवा या मोफत देण्यात येत आहेत. त्यामुळे जाधववाडी व लगतच्या भागातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा योजनेचा लाभ घेता येणार आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने बसलेल्या भागात झोपडपट्टी वस्तीपासून जवळ अशा ठिकाणी आरोग्य केंद्रांमध्ये तांत्रिक उपचार पद्धती विकसित करण्यात येत आहेत. शहराला स्मार्ट बनवण्यासाठी सातत्यपूर्ण आरोग्य गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान, विविध रोगांच्या प्रादुर्भाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यात येत आहे. त्यासाठी सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून आरोग्य निर्देशांक वाढवण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या जाधववाडी रुग्णालयात “हिंदु हृदयासम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ स्थापना केला आहे. 1 मे 2023 पासून त्यामध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
या दवाखान्यात नागरिकांना बाह्यरुग्ण सेवा (वेळ दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत), मोफत औषधोपचार, मोफत प्रयोग शाळा तपासणी, टेलीकन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण आदी आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय विभागाच्या याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त शेखर सिंह यांनी कार्योत्तर मान्यता दिली आहे. मोफत आरोग्य सुविधेमुळे जाधववाडी भागासह परिसरातील गरीब वर्गातील नागरिकांच्या आरोग्याची सोय झाली आहे. या दवाखान्यामध्ये दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिक व तत्सम मनुष्यबळ अत्याधुनिक तांत्रीक उपकरणांसह उपलब्ध करण्यात आले आहेत.
आरोग्य सेवेवर विशेष भर
पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य वैद्यकीय सेवेवर अधिक भर देत आहे. करोनाच्या काळात वैद्यकीय विभागाच्या सतर्कतेमुळे अनेकांचे प्राण वाचले. भविष्यात करोनापेक्षा भयावह साथरोगाची परिस्थिती निर्माण झाली तरी यशस्वीपणे त्यावर मात करण्यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्यावर भर दिला जात आहे. त्याला राज्य शासनाचे पाठबळ मिळत असल्यामुळे आपला दवाखाना जाधववाडी येथे सुरू करण्यात आला आहे. नव्याने सरू करण्यात आलेल्या पालिकेच्या थेरगाव, भोसरी, आकुर्डी रुग्णालयात देखील दर्जेदार रुग्णसेवा मिळत असल्यामुळे त्या-त्या भागातील नागरिकांची सोय झाली आहे.