अधिकाऱ्यांचे सूचक मौन : अधीक्षक अभियंता कार्यालयात अभियंत्यांचा ठिय्या
पिंपरी – भोसरी एमआयडीसीमधील वीजचोरी प्रकरण महावितरणच्या अधिकाऱ्यांमधील अंतर्गत खदखदीचे कारण बनले आहे. वीज चोरी पकडल्यानंतर महावितरणकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली. यानंतर महावितरणमध्येच अंतर्गत खदखद दिसून येत आहे.
भोसरी एमआयडीसी परिसरात सुमारे 47 शेडमध्ये औद्योगिक कारणांसाठी अनधिकृत वीजवापर सुरु असल्याची बाब महावितरणच्या कारवाईत उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार त्यानंतर इंद्रायणीनगर शाखा कार्यालयाच्या सहाय्यक अभियंतासह चार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईचे पडसाद मंगळवारी (दि.1) महावितरण कार्यालयात उमटले.
सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या गणेशखिंड परिमंडळ कार्यालयातील अधीक्षक अभियंता पंकज तगतपल्लीवार यांच्या कार्यालयाबाहेर मंगळवारी ठिय्या आंदोलन करत कारवाई रद्द करण्याची मागणी केल्याची चर्चा रंगली होती. सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्या निवेदनाची प्रतही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पत्रात सहाय्यक अभियंता यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी प्रेसनोट पाठवू असे सांगत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
कारवाईत दुजाभाव?
ट्रान्सफॉर्मरचा स्फोट आणि वीजचोरी प्रकरणात महावितरण प्रशासनाने दोन महिन्यांत एकूण आठ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यासाठी कर्मचारी आग्रही आहेत. कारवाईत होणारा दुजाभाव कळीचा मुद्दा ठरत असल्याची कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता पंकज तगतपल्लीवार व अन्य अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर सहाय्यक अभियंता यांच्यावरील कारवाई मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ही चर्चा यशस्वी झाली आहे.
– विश्वास भोसले , झोनल मॉनिटर, सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन