सातारा – मराठी कवितेला एक नवा चेहरा मोहरा मिळवून देणाऱ्या युगप्रवर्तक कवी बाळ सीताराम मर्ढेकर यांच्या 111 व्या जयंतीनिमित्त प्रस्तावित मर्ढेकर स्मारकामध्ये मर्ढेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच त्यांच्या कवितांच्या सादरीकरणातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कूपर उद्योगसमूहातर्फे मर्ढेकर स्मारकासाठी भेट देण्यात आलेल्या ग्रंथसंपदेमधील बा. सी. मर्ढेकर यांच्या साहित्यावरील पुस्तकांचे यावेळी पूजन करण्यात आले.
मर्ढेकर स्मारक समितीचे सदस्य, सातारा येथील कवी, पत्रकार श्रीनिवास वारुंजीकर आणि स्थानिक मर्ढेकरप्रेमी अजित जाधव यांनी कवितांचे सादरीकरण केले. यावेळी सरपंच श्री शिवाजी शिंगटे ग्रामपंचायतीचे अन्य कर्मचारी व सदस्य उपस्थित होते. तसेच मर्ढेकर यांच्या 111 व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन कवी संमेलनाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे वारुंजीकर यांनी सांगितले.
स्मारक समितीच्या सदस्यांनी ऑनलाईन कविता वाचनासाठी आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून वडूज, सातारा, पुणे, नवी मुंबई, नाशिक, रोहा-रायगड, कल्याण, मुंबई आणि थेट मलेशियामधून अनेक मर्ढेकर प्रेमींनी आपल्या कवितांचे व्हिडिओ पाठवले हे व्हिडिओ यूट्यूब चैनल वर एकत्रित या प्रसिद्ध करण्यात आले आहेत.