सात वर्षांनंतर दळणाच्या दरात एक रुपयाची वाढ
पिंपरी-चिंचवड चालक-मालक पीठ गिरणी महासंघाचा निर्णय
पिंपरी – शहरातील पीठ गिरण्यांमधील दळणाचे दर वाढविण्यात आले आहेत. प्रतिकिलो एक रुपयांची वाढ करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड चालक मालक पीठ गिरणी महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दसऱ्याला होणारी दरवाढ महिनाभर पुढे ढकलत ही दरवाढ दिवाळीनंतर लागू करण्याचा निर्णय महासंघाच बैठकीत घेतला असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष सुरेश लिंगायत यांनी दिली.
गेली सात वर्षांपासून शहरातील दळणाचे दर तेच आहेत. या कालावधीत वीजबील, दुकानभाडे, वाहतूक खर्च, कामगारांचे वेतन यामध्ये मोठी वाढ झाली आहे. याशिवाय शहरात घरगुती पीठ गिरण्यांची संख्यादेखील वाढली आहे.
तसेच अनेक कंपन्यांनी तयार पीठ बाजारात आणल्याने ग्राहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने चालकांना पीठ गिरणी चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही दरवाढ करणे आवश्यक होते. महासंघाच्या बैठकीत या दरवाढीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आजपासून (दि.1) ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
या बैठकीला संघटनेचे उपाध्यक्ष गुलाब वाल्हेकर, मोहन धुमाळ, दीपक बारणे, शहाजी घागडे, राहुल लांडगे, ज्ञानेश्वर काळभोर, रमेश पाटेकर, ज्ञानेश्वर हगवणे, सुरज बारणे, नागेंद्र जयस्वाल, बबलू जयस्वाल, संभाजी नढे, अरविंद जयस्वाल, जगजीवन जयस्वाल, धनंजय जयस्वाल उपस्थित होते.