पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील नागरिकांना सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम घेण्यासाठी चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह उभारले आहे. येथे कार्यक्रम करणार्या ग्राहकांकडून भाडे घेतले जाते. परंतु प्रेक्षागृहातील व्हीआयपी रूम मात्र बुकिंग करणारांना मिळत नाही. कारण त्यातून महापालिकेचा कारभार सुरू असल्याने प्रेक्षागृह बुकिंग करणार्या ग्राहकांना व्हीआयपी रुम उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विकासभाऊ साने सोशल फाऊंडेशन व विकास अनाथ आश्रमचे अध्यक्ष विकास साने यांनी केली आहे.
शहरातील एक अग्रगण्य सांस्कृतिक ठेव म्हणून प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह ओळखले जाते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने अनेक मेळावे आणि कार्यक्रमांसाठी पहिली पसंती म्हणून देखील शहरातील विविध संस्थांचे ते एक आवडते सभागृह आहे. यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात महसुली उत्पन्न महापालिकेस मिळते. कार्यक्रमांच्या आयोजकांना कार्यक्रमापुरता मान्यवरांच्या स्वागतासाठी प्रेक्षागृहाकडून व्ही.आय.पी. कक्ष उपलब्ध करून दिला जातो. मात्र , सध्या त्या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी काम करताना आढळून येत आहेत. परिणामी पैसे देऊनही कार्यक्रमांच्या आयोजकांची गैरसोय होत आहे. तरी, महापालिकेच्या संबंधित विभाग व महापालिका आयुक्तांनी व्हीआयपी रूम आयोजकांसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी साने यांनी केली आहे.