पुणे – बीआरटीच्या नावावर प्रशस्त पदपथ तयार करून शहरीकरणाचे पुरस्कार मिळणार्या महापालिकेने बीआरटी मार्ग काढून टाकला आहे. त्यामुळे ज्या मार्गाच्या नावावर महापालिकेने शहरीकरणासाठी पुरस्कार मिळविले ते नम्रपणे असेच स्वत: परत करावेत अशा परखड शब्दात शहरातील स्वयंसेवी संस्थानी महापालिकेच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.
शहरात दुचाकी , चारचाकी पेक्षा, बससारखे सार्वजनिक वाहन कमी जागेत कित्येक पटीने अधिक प्रवासी वाहून नेते यासाठी केंद्र शासनाचे शाश्वत वाहतूक धोरण, पुणे महानगरपालिका सर्वंकष वाहतूक आराखडा असे काही अहवाल आणि धोरणे तयार केली असून त्याचा आधार घेत महापालिकेने हा मार्ग उभारलेला होता. सुरवातीपासुनच बी.आर.टी. प्रकल्पाच्या उभारणीत व संचलनात काही त्रुटी होत्या ज्यामुळे पुणे बी.आर.टी. कधीही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालीच नाही व असुरक्षित देखील राहिली.
मात्र, या त्रूटी दूर करण्याऐवजी थेट हा प्रकल्प उखडण्यात आला आहे. या उलट 2015 पासून कार्यरत असलेली बीआरटी नुकत्याच कार्यरत झालेल्या मेट्रोसोबत जोडण्याची सुवर्णसंधी प्रशासनास सताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे दोन पर्याय असणारा रस्ता खासगी वाहनांसाठी प्रतिकूल करण्या ऐवजी बीआरटी काढून तो अनुकूल करण्याचा प्रयत्न केला असल्याची टिका करत सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंट, वास्तुविशारद आणि वाहतूक नियोजक, पादचारी प्रथम आणि पर्यावरण शिक्षण केंद्र या संस्थाच्या वतीने या प्रकाराचा निषेध करण्यात आला आहे.