- शहरातील आठ टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या
पिंपरी – खून, खुनाचा प्रयत्न, दंगा करून दुखापत करणे, शस्त्र बाळगणे, खंडणी, वाहन चोरी, जबरी चोरी, अपहरण, असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) अधिनियम 1999 नुसार कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी यंदा दोन महिन्यांत आठ टोळ्यांतील 56 गुन्हेगारांवर ही कारवाई केली.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोकळे व चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार योगेश दिनेश सावंत यांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. पोकळे टोळीचा प्रमुख असलेला तुळशीराम उर्फ बाबू नथूराम पोकळे (वय 34), दीपक धरमवीरसिंग चंडालिया (वय 34, दोन्ही रा. पिंपरी), उमेश सुधीन मोरे (वय 28, रा. पिंपळे सौदागर), सागर दत्तात्रय पतंगे (वय 28, रा. कटफळ, ता. बारामती), प्रवीण नागनाथ सोनवणे (वय 22, रा. मदनवाडी, ता. इंदापूर), कपील ग्यानचंद हासवानी (वय 30, रा. पिंपळे सौदागर), राकेश राजकुमार हेमनानी (वय 27, रा. पिंपरी), प्रभू अडप्पा पुजारी (रा. चिखली) यांच्या विरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोकळे याच्यासह त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई केली.
सावंत टोळीचा प्रमुख असलेला योगेश दिनेश सावंत (वय 28, रा. रुपीनगर, तळवडे), आकाश उर्फ गुंड्या प्रकाश भालेराव (वय 21), रुपेश प्रकाश आखाडे (वय 23, दोन्ही रा. त्रिवेणीनगर), सनी उर्फ नकुल अनिल कुचेकर (वय 25, रा. वाल्हेकरवाडी), गौरव रमेश डांगले (वय 22, रा. चिंचवडगाव), अर्जुन महादेव गोपाळे (वय 26, रा. शिरगाव, ता. मावळ), किरण अरुण लोखंडे (वय 27, रा. शिरगाव, ता. मावळ), सुदिश सुरेंद्रन सदानंद (वय 28, रा. आकुर्डी), सुचेतन सदाशिव चौधरी (वय 28, रा. वाल्हेकरवाडी) यांच्या टोळीवरही मोक्कांतर्गत कारवाई झाली.
पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी प्रस्ताव सादर केला. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी प्रस्ताव पारित केला. यंदा जानेवारी ते मार्च दरम्यान आठ टोळ्यांमधील 56 सराईत गुन्हेगारांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
अडीच वर्षांत 25 टोळ्यांवर मोक्का
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू झाल्यापासून गेल्या अडीच वर्षांत एकूण 25 टोळ्यांमधील दीडशे सराइत गुन्हेगारांवर पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे. तर नऊ सराईत गुन्हेगारांना एक वर्षासाठी एमपीडीए खाली स्थानबद्ध करून त्यांची रवानगी तुरूंगात केली आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केल्याने शहरातील गुन्हेगारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.