सोशल मीडियाची भीती म्हणजे एडिटिओव्हल्टा फोबिया

स्मार्टफोनपासून दूर रहाणं : नोमोफोबिया

प्रत्येकालाच कशाची तरी भीती वाटते. काहीजण विमानात बसायला घाबरतात. काहींना एकटेपणाची तर काहींना अंधाराची भीती वाटते. याच भीतीला वैद्यकीय भाषेत फोबिया म्हणतात. ही भीती इतकी तीव्र असते की त्यांना काहीच करता येत नाही. या भीतीमुळे व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतो. विविध प्रकारचे फोबिया नेहमीच चर्चेत असतात. जीवनशैलीतले बदल तसंच इतर काही कारणांमुळे या भीतीत भर पडत चालली आहे. फोबियांचे प्रकार बदलत आहेत. फोबियाच्या नव्या प्रकारांचा शोध लागला आहे. त्याविषयी…

एडिटिओव्हल्टा फोबिया हे नाव सहसा कोणी ऐकलं नसेल. हे भलं मोठं नाव ऐकून कोणालाही धक्का बसेल. सोशल मीडियाची भीती म्हणजे एडिटिओव्हल्टा फोबिया. आपण सतत कोणाच्या तरी नजरेत आहोत, सोशल मीडियामुळे अनेकजण आपलं निरिक्षण करत असतील असे विचार यामुळे मनात येऊ लागतात. म्हणूनच सोशल मीडियापासून लांब रहायला हवं.

सध्याच्या काळात स्मार्टफोनशिवाय जगणं अशक्य झालं आहे. स्मार्टफोनपासून दूर रहाणं अनेकांना सहन होत नाही. याला नोमोफोबिया असं म्हटलं जातं. यात फोन जवळ नसला की अस्वस्थता जाणवते. सतत मोबाईल फोनचा विचार करणं, फोन घरी विसरल्यावर आलेले मेसेज तसंच मिस्ड कॉलबद्दल विचार करत राहणं म्हणजे नोमोफोबिया.

इको-एंक्झायटी हा प्रकार सध्याच्या काळात नवा आहे. पर्यावरणाच्या हानीबद्दलच्या बातम्या सतत येत असतात. पृथ्वीचं वाढतं तापमान, वितळणारा बर्फ, जंगलांना लागणार्‍या आगी यामुळे पृथ्वीवरची जीवसृष्टी धोक्यात आली आहे, असा अनेकांचा समज होतो. अनेकांच्या मनात हवामानबदलाच्या दुष्परिणामांची भीती बसली आहे. त्यातही तरुणांना आापल्या भविष्याची खूप काळजी वाटते. हवामानबदलाचा विचार समोर आला की अनेकजण घाबरू लागतात. यालाच इको-एंक्झायटी असं म्हटलं जातं.

फूड निओफोबियाचं प्रमाणही वाढत चाललं आहे. या प्रकारच्या फोबियामध्ये एखादा नवा पदाथं खाऊन बघण्याबाबत प्रचंड अस्वस्थता जाणवते. लहान मुलांमध्ये हा फोबिया आढळतो.

सध्या फॅड डाएट्सचं प्रमाण वाढलंय. बारीक राहण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. कर्बोदकांच्या सेवनामुळे वजन वाढतं, असंही बोललं जातं. कर्बोदकांमुळे वजन वाढण्याची भीती कार्बोफोबियाला जन्म देते. म्हणूनच अनेकांना कर्बोदकं खाण्याची प्रचंड भीती वाटते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.