पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर पवनाथडी जत्रा ११ ते १५ जानेवारी दरम्यान भरविण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळवार (दि. २)पर्यंत एकूण ७५० महिला बचत गटांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जाची सोडत सोमवारी (दि. ८) काढण्यात येणार असून त्यानंतर स्टॉलचे वितरण केले जाणार आहे.
महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व साहित्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, म्हणून महापालिकेच्या वतीने दरवर्षी पवनाथडी जत्रा भरवली जाते. त्याला पिंपरी-चिंचवडमधील महिला बचत गटांचा चांगला प्रतिसाद मिळतो. बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू व साहित्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. विशेषतः खवय्ये खाद्यपदार्थांना पसंती देतात.
जत्रेत ४०० स्टॉल असणार आहेत. त्यात बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू, साहित्य, कपडे आदींसह खाद्यपदार्थांचे स्टॉल असणार आहेत. स्टॉलसाठी बचत गटांकडून मंगळवारपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. समाज विकास विभागाकडे नोंदणी असलेल्या ७५० महिला बचत गटांनी विभागाकडे अर्ज केले आहेत. त्या सर्व अर्जांची दोन ते तीन दिवसात छाननी केली जाणार आहे. त्यातील पात्र अर्जाची येत्या सोमवारी काढली जाणार आहे. त्यानुसार महिला बचत गटांना स्टॉलचे वितरण केले जाणार आहे. एका स्टॉलचे दोन भाग केले जाणार आहेत.
नागरिकांना प्रशासकीय माहिती घेण्याची सोय
पवनाथडीत महिला बचत गटांच्या स्टॉल असणार आहेतच पण महापालिकेच्या विविध योजना, विविध विभागाची माहिती घेण्यासाठी देखील स्टॉल असणार आहेत. महापालिकेचा समाज विकास विभाग, नवी दिशा, दिव्यांग कक्ष, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड तसेच, विविध विभागांचे स्टॉल असणार आहेत. त्या माध्यमातून महापालिका आपल्या विभागांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविणार आहे. जत्रेत पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. बालगोपाळांसाठी मनोरंजननगरी असणार आहे. पवनाथडी आयोजनावर तब्बल १ कोटी ३० लाखांचा खर्च केला जाणार आहे.
सोमवारी सोडत व स्टॉलचे वितरण
पवनाथडी जत्रेत एकूण ४०० स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहेत. एका स्टॉलचे दोन भाग करून ते दोन महिला बचत गटांना देण्यात येणार आहेत. मुदतीमध्ये पात्र झालेल्या ७५० अर्जाची छाननी करून त्याची सोडत सोमवारी (दि. ८) काढण्यात येणार आहे. हे स्टॉल विनामूल्य देण्यात येणार आहेत. नागरवस्ती विकास योजना विभागाकडे नोंदणी असलेल्या बचत गटांचे अर्ज पात्र ठरणार आहेत. शहराबाहेरील एकाही बचत गटाला स्टॉल दिला जाणार नाही, असे महापालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी सांगितले.