पिंपरी – खरेदी केल्यानंतर युपीआयद्वारे पेमेंट केल्याचा बनावट स्क्रीन शॉट दाखवून तब्बल चारशे जणांना गंडा घालणाऱ्या बंटी बबलीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कामगिरी केली.
गणेश शंकर बोरसे (वय 34), आणि त्यांची पत्नी (वय 28. दोघे रा. काकडे यांची रुम, पठारे वस्ती, लोहगाव, पुणे) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीपकुमार माली (रा. रहाटणी) यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करीत असताना पोलीस शिपाई प्रशांत सैद यांनी तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीची ओळख पटवली. मात्र, आरोपी व्यवसायिकांना फसविल्यानंतर मोबाइल स्वीचऑफ करीत असल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या. तसेच, प्रत्येक वेळी आरोपी नवीन मोबाइल क्रमांकाचा वापर करीत होता. दरम्यान, आरोपी रहाटणी, वाकड परिसरात फिरत असल्याची माहिती युनिट चारच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत आरोपींनी मागील दोन ते तीन वर्षांत अनेकांना गंडा घातल्याची कबुली दिली.
… अशी करायचे फसवणूक
आरोपी सुरुवातीला दुकानदाराशी गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन करीत होते. त्यानंतर घरात लागणाऱ्या तसेच मौजमजेच्या वस्तुंची खरेदी करायचे. खरेदी झाल्यानंतर ऑनलाइन पेमेंट केल्याचे सांगून आयसीआय बॅंकेच्या बनावट ऍपचे स्क्रीन शॉट दुकानदाराला दाखवले जायचे. पेमेंट आले नसल्यामुळे दुकानदाराने आरोपींना थांबवल्यास ”24 तासाच्या आत पेमेंट येते, पेमेंट आले नाही तर मला फोन करा”, असे सांगून आरोपी स्वतःचा मोबाइल क्रमांक दुकानदारांना द्यायचे. एकदा आरोपी दुकानाच्या बाहेर पडले की, लगेचच दुकानदाराचा मोबाइल नंबर ब्लॉक लिस्टला टाकला जात होता. त्यानंतर आरोपी मोबाइलमधून सिमकार्ड काढून नवीन नंबरचे सिमकार्ड घेत होते.
छोट्या मोठ्या दुकानदारांना गंडा
पकडले जावू नये, यासाठी आरोपीने पत्नीला मोबाइल वापरण्यास दिला नाही. तसेच, मोबाइल वरून एकही कॉल केला नाही. आरोपीने अनेक व्यावसायिकांना फसवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.