पिंपरी – पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गेल्या आठवडाभरात पोलीस आयुक्तालयातील तब्बल १८० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये सहा पोलीस उपायुक्त, सहा सहायक आयुक्त ५४ सहायक पोलीस निरीक्षक, ११४ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.
२२ जोनवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर कधीही लोकसभेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू शकते. निवडणूक आयोगानेही याबाबत तयारी केली आहे. तसेच सर्व राजकीय पक्ष, निवडणूक विभागही कामाला लागला आहे. त्यानुसार निवडणूक विभागाने एका ठिकाणी तीन वर्षे, एकाच विभागात आठ वर्षे, तसेच जिल्ह्यात चार वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील बदलीपात्र पोलिसांना बदल्याचे वेध लागले होते. अनेकांमध्ये तर आपल्याला सोयीचे अथवा ’मलाईदार’ ठाणे मिळावे, यासाठी फिल्डींग लावली आहे. दरम्यान गेल्या आठवड्यासून पोलीस आयुक्तांनी बदल्यांचे हे सत्र सुरू केले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहा पोलीस उपायुक्त असून त्या सर्वांची अंतर्गत बदली करण्यात आली आहे. तसेच आठ सहायक पोलीस आयुक्त असून त्यापैकी सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच ५४ सहायक पोलीस निरीक्षक आणि ११४ पोलीस उपनिरीक्षक यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.
सध्या पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्या तरी पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत. आगामी काही दिवसांत पोलीस महासंचालक कार्यालयातूनही बदल्याबाबतचे आदेश निघू शकतात. त्यामुळे आगामी काळात काही नवीन पोलीस अधिकारी पिंपरी चिंचवड आयुक्तालयात दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच पाच पोलीस निरीक्षक हे मूळचे पुणे जिल्ह्यातील असून लवकरच त्यांच्या बदलीचे आदेश येऊ शकतात. जर त्यांची बदली राज्यातील अन्य जिल्ह्यात झाली नाही तर त्यांना साइट ब्रांचला बदली केली जाईल. मात्र या पोलीस निरीक्षकांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही.
कर्मचारीही बदल्यांच्या प्रतिक्षेत
एका पोलीस ठाण्यात सहा वर्ष कर्तव्य बजावलेल्या पोलिसांची बदली केली जाते. दरवर्षी पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात. साधारणः या बदल्या एप्रिल किंवा मे महिन्यात केल्या जातात. मात्र २०२२ मधील बदल्यांना उशीर झाला होता. त्यामुळे २०२३ मध्ये कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या नाहीत. ज्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत ते कर्मचारी आपल्या बदलीच्या प्रतिक्षेत आहेत.