मंगळवारी करोनाने एकही मृत्यू नाही
पिंपरी – एकीकडे करोनाच्या नव्या प्रकाराने जगभरात भीतीचे वातावरण असताना पिंपरी-चिंचवड शहरात मात्र मंगळवारी एकाही रुग्णाचा करोनाने मृत्यू झाला नाही. शहरामध्ये आज करोनाबाधित 129 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 129 जणांना करोनाची लागण झाली. यामुळे शहरातील आतापर्यंतच्या एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 95563 वर पोहचली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 127 व शहराबाहेरील 2 रुग्णांना करोनाची लागण झाली. तसेच आज दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मंगळवारी दिवसभरात 129 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 92083 इतकी झाली आहे.
तर दिवसभरात 2396 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1042 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 752 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 991 इतकी आहे.
दोन्ही मिळून उपचाराधीन असलेले रुग्णांची संख्या 1743 इतकी आहे. आतापर्यंत शहरातील 5 लाख 32 हजार 241 नागरिकांची करोना चाचणी झाली आहे. त्यापैकी 4 लाख 35 हजार 636 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.