पिंपरी, दि. 16 (अमोल शित्रे) -मिळकत कर भरण्यास विलंब करणाऱ्या सर्वसामान्यांच्या घराला ऐन सणासुदीच्या काळात टाळे ठोकण्याची मोहीम कर संकलन विभागाने हाती घेतली आहे. शनिवारी (दि. 15) निवासी व बिगरनिवासी अशा 153 मिळकती सील केल्या आहेत. महापालिकेला करोडो रुपयांचा चुणा लावणाऱ्या वाणिज्य व औद्योगिक मिळकतींना पाठीशी घालून निवासी मिळकती सील करण्याचा “भीमपराक्रम’ कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सुरू केला आहे. करोनामुळे अधीच आर्थिक कंबरडे मोडले असताना तसेच महागाई वाढल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य नागरिकांवर पालिकेच्या कारवाईमुळे “संक्रांत’ ओढावली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत निवासी व बिगरनिवासी मिळकतींची संख्या एकूण 5 लाख 78 हजार आहे. 2022-23 या चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या कार्यकाळात एकूण 2 लाख 18 हजार 170 मिळकतधारकांनी 360 कोटींचा कर भरणा केला आहे. त्यामध्ये 1 लाख 58 हजार 677 मिळकतधारकांनी घरबसल्या ऑनलाइन माध्यमाचा उपयोग करत 207 कोटी 62 लाखांचा कर भरणा केला. तर, 47 हजार 776 मिळकतधारकांनी 51 कोटी 89 लाखांचा भरणा रोख आणि डीडीद्वारे केला आहे. 11 हजार 717 नागरिकांनी 52 कोटी 89 लाखांची बिले जमा केली आहेत. कर भरण्यास मिळकतधारकांनी एवढा चांगला प्रतिसाद दिला. तरीही, कर संकलन विभागाकडून 5 लाखांपेक्षा अधिक मिळकत कर थकीत असलेल्या व्यावसायिक व 1 लाखापेक्षा अधिक कर थकीत असलेल्या निवासी मालमत्ता जप्त करण्याची धमकी कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली आहे. त्यानुसार ऑक्टोबर 2022 मध्ये 1 हजार 361 मालमत्ता जप्त करण्याची मोहीम सुरू केली आहे.
3 लाख 60 हजार मिळकतींवर आसूड
यावर्षी कर संकलन विभागापुढे 1 हजार कोटी रुपयांच्या कर वसुलीचे टार्गेट ठेवले आहे. पुढील सहा महिन्यांत 640 कोटी मिळकत कर वसूल करण्याचे आव्हान या विभागाने घेतले आहे. ऑक्टोबर 2022 ते 31 मार्च 2023 या सहा महिन्यांच्या कलावधीत 640 कोटी कर वसूल करण्याचे टार्गेट समोर आहे. अद्याप 3 लाख 60 हजार मिळकत धारकांनी कर जमा केलेला नाही. कर जमा करण्यासाठी मिळकतींवर आसूड ओढला जात आहे. 640 कोटींच्या वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कर संकलन विभागाच्या 16 विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव वाढवला आहे. जो कर भरण्यास तयार नाही, अशा निवासी असो वा वाणिज्य त्या सर्व मिळकती थेट सील करण्यात याव्यात, असा आदेशच कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त देशमुख यांनी काढला आहे.
उत्सवकाळात संकट
पिंपरी-चिंचवडमधील सुमारे 3 लाख 60 मिळकतधारकांचा कर थकीत आहे. वाणिज्य मिळकतींना अभय देऊन निवासी मिळकतींचा कर वसुलीचा धडाका कर संकलन विभागाने लावला आहे. उत्सवकाळात कर संकलन विभागाची वसुली जोरात सुरू आहे. जो पैसे देण्यास तयार नाही, त्याला कायदेशीर मार्गाने दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. धनाड्य लोकांना सोडून सामान्यांच्या मागे हात धुवून हा विभाग लागल्यामुळे नागरिकांचे दिवाळे निघण्याची वेळ आली आहे. ऐन सणाच्या काळात कर संकलनाचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे की अन्य काही करण्याचा उद्देश आहे, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. सणाच्या काळात तरी अशा पद्धतीची कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी मिळकतधारकांनी केली आहे.
सर्वच राजकीय पक्ष “मूग गिळून गप्प’
एरव्ही जनतेच्या प्रश्नांसाठी आरडा ओरड करणारे सर्वच राजकीय पक्षांचे नेते या कारवाईबाबत “मूग गिळून गप्प’ असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. कोट्यवधींचे भ्रष्टाचार, लूट आणि महापालिकेला ओरबडून खाण्याची स्पर्धा महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असते. सर्वसामान्यांचे कैवारी आम्हीच आहोत अशी भीम प्रतिज्ञा करणारे सर्वच पक्षाचे नेते गायब झाल्याने त्याचा फटका येत्या महापालिका निवडणुकीत या नेत्यांना बसण्याची शक्यता या कारवाईमुळे निर्माण झाली आहे.