पिंपरी, दि. 16 (प्रतिनिधी) -पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना तात्काळ सुविधा मिळण्यासाठी आठ ठिकाणी क्षेत्रीय कार्यालय उभारले आहेत. त्यांना बहुतांश अधिकार बहाल केले आहेत. त्यांचे विविध विभाग नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी काम करत आहेत. परंतु “फ’ क्षेत्रीय कार्यालयाचा ड्रेनेज विभाग काम करतो की नागरिकांच्या भावनांशी खेळतोय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.
स्पाइन रोडवरील चेरी चौक ते भाजी मार्केट चौक दरम्यान असलेल्या रस्त्याच्या मधल्या मोकळ्या जागेत मागील काही महिन्यांपासून सातत्याने ड्रेनेजलाइन तुंबत आहे. मागील पंधरा दिवसांपासून शरदनगर येथील भागात सुदर्शन सोसायटीच्या अगदी समोरील बाजूला असलेल्या स्पाइन रोडच्या मधल्या भागात ड्रेनेजलाइन तुंबली आहे. याच ठिकाणी मागील काही महिन्यांपासून साधारण तीन ते चार वेळा ड्रेनेजलाइन तुंबली आहे. परंतु “फ’ क्षेत्रीय कार्यालयाचा ड्रेनेज विभाग केवळ तात्पुरती मलमपट्टी करत आहे. त्यामुळे सातत्याने येथे ही घटना घडत आहे. मागील पंधरा दिवसांपासून ही लाइन तुंबली असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना, वाहनचालकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी जर वारंवार चेंबर तुंबत असेल तर महापालिकेचे कामकाज कधी सुधारणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
चेंबरची झाकणे चोरून नेली जात आहेत. तर काही वेळेस झाकणे फोडून त्यात दगड, माती टाकली जात आहे. त्यामुळे ड्रेनेजलाइन तुंबत आहे. तर काही सोसायट्यांनी आपले रेन वॉटर हर्विस्टिंगचे पाणी ड्रेनेजलाइन जोडले आहे. त्यामुळे पावसाळ्यात बऱ्याच वेळा ड्रेनेजलाइन ओव्हरफ्लो होत आहेत. मागील काही दिवसांपासून येथील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन ते चार दिवसांत येथील समस्या सुटेल.
– जी. डी. स्वामी, कनिष्ठ अभियंता, फ क्षेत्रीय कार्यालय.
उद्यानाच्या कामावर फिरले मैलामिश्रित पाणी
महापालिकेच्या वतीने स्पाइन रोडच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत हॉकर्स झोन आणि उद्यान विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी मागील काही महिन्यांपासून कामकाज सुरू आहे. परंतु याच भागात ड्रेनेजलाइन तुंबल्याने उद्यानाचे सुरू असलेले काम अक्षरशः मैलामिश्रित पाण्याखाली आले आहे. परंतु महापालिकेचा ड्रेनेज विभाग, क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी मात्र याकडे डोळेझाक करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
महापालिकेकडून डेंगीच्या आजाराला निमंत्रण
महापालिका डेंगी आटोक्यात आणण्यासाठी शहरात सर्वेक्षण करत आहे. तसेच डेंगीच्या आळ्या निर्माण होणारे ठिकाण शोधून संबंधितांना दंड आकारत आहे. परंतु महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे मागील पंधरा दिवसांपासून स्पाइन रोड येथे मैलामिश्रित पाणी दिवसरात्र वाहत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. तसेच या दूषित पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून महापालिकेचा कामचुकार कारभारामुळे डेंगीच्या आजाराला एक प्रकारे निमंत्रण देण्याचे काम केले जात आहे. शरदनगर, संभाजीनगर, घरकुलमधील नागरिक त्रस्त आहेत.